चीनच्या झिंजियांग प्रांतात उपग्रहभेदी लेझरचा तळ – लष्करी अभ्यासकाचा दावा

चीनच्या झिंजियांग प्रांतात उपग्रहभेदी लेझरचा तळ – लष्करी अभ्यासकाचा दावा

वॉशिंग्टन – शस्त्रस्पर्धेत अमेरिकेला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या चीनने अंतराळ युद्धाची मोठी तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. अल्पसंख्यांकांची मुस्काटदाबी करून झिंजियांग प्रांताचा लष्करी ताबा घेणार्‍या चीनने याच भागात उपग्रहभेदी लेझर यंत्रणेचा छुपा तळ उभारल्याचा दावा एका लष्करी अभ्यासकाने केला आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने झिंजियांगप्रमाणे देशभरात असे पाच लेझर तळ विकसित केल्याची माहिती या अभ्यासकाने दिली आहे.

चीनच्या वायव्येकडील ‘झिंजियांग’ प्रांताची राजधानी ‘उरूम्की’पासून १४५ मैल अंतरावर चीनने हा लेझर तळ विकसित केला आहे. चीन तसेच इतर देशांच्या उपग्रहांवर नजर ठेवणारी केंद्रे चीनच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरली आहेत. या उपग्रहांवर पाळत ठेवून योग्यवेळी सदर उपग्रहांना लक्ष्य करण्याची योजना चीनने आखल्याचा दावा, चीनच्या लष्करी हालचालींवर नजर ठेवणार्‍या भारतीय लष्कराच्या निवृत्त अधिकार्‍याने अमेरिकी संकेतस्थळावर केला. एखाद्या उपग्रहाचा भ्रमणमार्ग आणि इतर माहिती उपलब्ध झाल्यानंतर चीनमध्ये छुप्यारितीने अस्तित्वात असलेले ‘लेझर तळ’ शत्रूचा उपग्रह गारद करू शकतात, असेही या लष्करी विश्‍लेषकाचे म्हणणे आहे.

झिंजियांग येथील लेझर तळाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स या विश्‍लेषकाने माध्यमांमध्ये उघड केले असून असेच चार लेझर तळ चीनच्या इतर भागात असण्याची शक्यता वर्तविली आहे. झिंजियांग येथील लेझर तळावर ‘स्लाईडिंग’ छत टाकून चीनने सदर यंत्रणा अमेरिका व मित्रदेशांच्या उपग्रहांपासून दडविण्याचा प्रयत्न केला. चार इमारतींवर असे छत असून यापैकी एका इमारतीचे छत मागे सरकल्यामुळे चीनच्या या तळाचा पर्दाफाश झाला. या तळाचे उपग्रहीय फोटोग्राफ्स माध्यमांसमोर आले असून यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

चीन उपग्रहभेदी लेझरच्या सहाय्याने अंतराळातील उपग्रहांना धोका निर्माण करू शकतो, असा इशारा फेब्रुवारी महिन्यातच गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात दिला होता. मात्र चीनच्या या लेझर यंत्रणेत अंतराळातील उच्चस्तरीय कक्षेत स्थिरावलेल्या प्रगत उपग्रहांना भेदण्याइतकी क्षमता नसल्याचा दावा गुप्तचर यंत्रणेने आपल्या अहवालात केला होता. पृथ्वीजवळच्या कक्षेतील उपग्रह भेदणार्‍या यंत्रणेने सज्ज होण्यासाठी चीनला पुढील वर्षापर्यंत प्रतिक्षा करावी लागेल, असे या अहवालात म्हटले आहे.

पण या काळात चीन ‘एनर्जी वेपन्स’चा वापर उपग्रह निकामी करण्यापासून अंतराळातील शत्रूच्या हितसंबंधितांना ध्वस्त करण्याची तंत्रज्ञान हस्तगत करील, याची जाणीव या अहवालातून करून देण्यात आली होती. सध्या चीन लेझर यंत्रणेच्या वापरावर लक्ष केंद्रीत करीत असून मायक्रोवेव्ह्ज् आणि रेडिओ लहरींचाही वापर शस्त्रासारखा करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला. त्यामुळे चीनच्या हालचालींकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

याआधी २००६ साली चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्र प्रक्षेपित करून अंतराळातील आपला निकामी उपग्रह भेदल्याचा दावा केला होता. चीनच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर जगभरातून टीका झाली होती. पण त्यावेळी चीनने लेझरचा वापर करून उपग्रह भेदल्याचा दावा अमेरिकेतील काही विश्‍लेषकांनी केला होता.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळाचे महत्त्व अधोरेखित करून ‘स्पेस फोर्स’ची स्थापना केली आहे. चीनच्या या लेझर तळांची तयारी लक्षात घेता अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’चे महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info