‘आसियन’साठी सोन्यावर आधारित नवे चलन हवे – मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचा प्रस्ताव

‘आसियन’साठी सोन्यावर आधारित नवे चलन हवे – मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचा प्रस्ताव

टोकिओ – ‘सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व अर्थव्यवस्था अमेरिकी चलन डॉलरशी जोडलेल्या असून त्यात एकाच देशाला हवे तसे बदल घडवून इतर देशांच्या चलनांना वेठीला धरले जाते. एकाच देशात घडणार्‍या घटनांचे परिणाम इतर देशांवर होतात’, अशा शब्दात अमेरिकी डॉलरवर टीकास्त्र सोडून मलेशियाच्या पंतप्रधानांनी ‘आसियन’साठी नव्या चलनाचा प्रस्ताव दिला. हे चलन सोन्यावर आधारित असावे व त्याचा वापर मुख्यत्वे करून व्यापारासाठी व्हावा असेही मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.

मलेशियाचे पंतप्रधान सध्या जपानच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर असून यावेळी त्यांनी राजधानी टोकिओत झालेल्या ‘फ्युचर ऑफ एशिया’ या परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेत बोलताना पंतप्रधान महाथिर यांनी ‘आसियन’ देशांसाठी स्वतंत्र चलनाची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी १९९७ साली आग्नेय आशियात आलेल्या आर्थिक संकटाचाही दाखला दिला.

‘११९७ साली थायलंडमध्ये आर्थिक संकट उद्भवल्यानंतर तोडगा म्हणून मलेशियाला त्यांचे चलन डॉलरशी जोडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर व्यापार्‍यांनी मलेशियाचे चलन विकल्यामुळे त्याचे मूल्य घसरले. चलन घसरल्यानंतर काहींनी ते पुन्हा मोठ्या प्रमाणात खरेदी केले होते. अशा रितीने होणारे चलन व्यवहार अर्थव्यवस्थेसाठी फारसे हितकारक नाहीत. चलनांच्या या व्यवहारातून देशाची कामगिरी लक्षात येत नाही’, अशा शब्दात त्यांनी अमेरिकी डॉलरवर आधारित असलेल्या चलनव्यवस्थेवर कोरडे ओढले.

यावर उपाय शोधायचा असेल तर आग्नेय आशियाई देशांसाठी सोन्यावर आधारित स्वतंत्र चलन हा एक पर्याय ठरु शकतो, अशा शब्दात मलेशियाच्या पंतप्रधानांनी नव्या चलनाचा प्रस्ताव दिला. याचा उल्लेख त्यांनी ‘स्पेशल करन्सी ऑफ इस्ट एशिया’ असा करून शक्य झाले तर बाहेरील देशही याचा वापर करु शकतील, असे संकेत दिले. त्याचवेळी हे चलन आशियाई देशांमधील व्यापारी व्यवहारांसाठीच वापरले जाईल, असेही पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षात रशिया व चीन या दोन देशांकडून अमेरिकी डॉलरला पर्यायी चलन देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. या दोन्ही देशांकडून सोन्याच्या राखीव साठ्यात मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली असून चीन सोन्यावर आधारित चलन आणण्यासाठी यंत्रणा उभारत असल्याचे दावेही समोर आले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info