Breaking News

१९८९ साली हजारोजणांचा बळी घेणारी ‘तिआनमेन स्क्वेअर’मधली चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची कारवाई योग्यच – चीनच्या संरक्षणमंत्र्यांचे समर्थन

सिंगापूर – तीस वर्षांपूर्वी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने लोकशाहीची मागणी करणार्‍या हजारो निदर्शकांचा बळ घेतला होता. बीजिंगच्या ‘तियानमेन स्क्वेअर’ येथे झालेल्या या कारवाईचे समर्थन करून चीनने जगाला आणखी एक धक्का दिला आहे. ‘गेल्या तीन दशकात चीनमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. हे लक्षात घेतले तर त्याकाळात चीनच्या राजवटीने केलेली कारवाई योग्यच असल्याचे स्पष्ट होते’, असे धक्कादायक विधान चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी केले.

‘तिआनमेन स्क्वेअर’, निदर्शन, वी फेंगहे, कम्युनिस्ट राजवट, संरक्षणमंत्री, हत्याकांड, चीन, व्यापारयुद्ध३ जून रोजी ‘तिआनमेन स्क्वेअर’च्या हत्याकांडाला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगभरात लोकशाहीची मागणी करणार्‍या चिनी निदर्शकांची आठवण जागविली जात आहे. पण चीनचे संरक्षणमंत्री वी फेंगहे यांनी तिआनमेनमधल्या नरसंहाराचे समर्थन केले. चीनच्या सत्ताधारी राजवटीच्या वरिष्ठ नेत्याकडून तिआनमेन प्रकरणी चीनकडून आलेले हे अधिकृत वक्तव्य असल्याने फेंगहे यांच्या या समर्थनाला फार मोठे राजकीय महत्त्व आहे.

१९८९ सालच्या जून महिन्यात चीनमधील विद्यार्थी संघटनेने लोकशाहीच्या मागणीसाठी तिआनमेन चौकात मोठे आंदोलन छेडले होते. हजारो विद्यार्थी व चीनमधील लष्करी राजवटीला कंटाळलेल्या जनतेने या आंदोलनात सहभाग घेतला होता. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसाठी धोकादायक ठरणारे हे आंदोलन चिरडण्यासाठी चीनने निर्दयीपणे लष्करी कारवाई केली होती. ३ व ४ जून रोजी झालेल्या या कारवाईसाठी रणगाडे वापरले होते व यात शेकडो निःशस्त्र विद्यार्थ्यांचा बळी गेला. तर शेकडोंना अटक झाली. या कारवाईत कित्येक बेपत्ता झाल्याच्या नोंदीही आहेत. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने यबाबत दिलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात या भयंकर कारवाईत बळी पडलेल्यांची संख्या कितीतरी पट अधिक असल्याचे दावे केले जातात.

गेली ३० वर्षे तिआनमेन आंदोलन तसेच त्यावरील कारवाईबाबतची माहिती चीनने उघड केलेली नाही. याबाबत खासगी किंवा सार्वजनिक स्तरावर बोलण्यासही चीनने निर्बंध घातले आहेत. असे असताना सिंगापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे त्याचे समर्थन करणे लक्ष वेधून घेणारे ठरले. तिआनमेन प्रकरणाला ३० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अवघ्या २४ तासांपूर्वी हे वक्तव्य येणे हा योगायोग नाही.

गेल्या काही वर्षात चीनचे राष्ट्राध्यक्ष व सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वा बनलेल्या ‘शी जिनपिंग’ यांनी देशावरील आपली पकड अधिकाधिक घट्ट करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या एकाधिकारशाहीवर तीव्र जगभरातून तीव्र टीका होत असली, तरी सत्ताधारी राजवटीने जिनपिंग यांचाच शब्द अंतिम असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र चीनमधील काही मोजके गट जिनपिंग यांच्या राजवटीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे चीनच्या पोलादी भिंतीमागे सारे काही आलबेल नसल्याचे दिसते.

अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला एकामागोमाग एक हादरे बसत आहेत. त्याचवेळी चीनमधील अंतर्गत प्रशासन कर्जाच्या बोज्याखाली दबले असून कधीही कोसळू शकते, असे इशारे वारंवार देण्यात येत आहेत. देशातील शेकडो कंपन्या बंद पडत असून शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडणारे लाखो तरुण बेरोजगार राहण्याची भीती नुकतीच व्यक्त करण्यात आली आहे. चीनमधील विद्यार्थी तसेच सैनिकांनी जिनपिंग यांच्या राजवटीविरोधात नाराजी दाखविणारी आंदोलनेही केली असून त्याची तीव्रता हळुहळू वाढत चालली आहे. ग्रामीण भागातही स्थानिक प्रशासनाविरोधातील नाराजीचे रुपांतर आंदोलन तसेच छोट्यामोठ्या चकमकींमध्ये होण्याचे प्रमाण वाढले आहे.

या वाढत्या असंतोषावर थेट उपाययोजना करण्याऐवजी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपली व चीनची प्रतिमा कायम कशी राहिल, यावरच भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजवट स्थिर राखण्यासाठी वारंवार देशाची संरक्षणदले तसेच तरुणांना सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी एकनिष्ठ रहा, अशी आवाहने करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी ‘तिआनमेन’चे समर्थन करून या देशावरील आपल्या राजवटीची पोलादी पकड तितकीच भक्कम असल्याचा संदेश दिला. वेळ पडलीच तर चीनची राजवट पुन्हा ‘तिआनमेन’ घडवताना कचरणार नाही, असा इशाराच फेंगहे यांच्या विधानातून देशांतर्गत विरोधकांना तसेच आंतरराष्ट्रीय समुदायालाही देण्यात आला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info