हाँगकाँगच्या जनतेचा चीनच्या विरोधात ‘अखेरचा संघर्ष’

हाँगकाँगच्या जनतेचा चीनच्या विरोधात ‘अखेरचा संघर्ष’

हाँगकाँग – अमेरिकेविरोधातील व्यापारयुद्धामुळे अर्थव्यवस्थेला बसणार्‍या धक्क्यांच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सत्ताधारी राजवटीविरोधात असंतोष तीव्र झाला आहे. हाँगकाँगमध्ये चीनसमर्थक प्रशासनाने स्थानिक गुन्हेगारांना चीनकडे सोपविण्याची तरतूद असणारे विधेयक सादर केले आहे. हे विधेयक म्हणजे हाँगकाँगचे प्रशासन चीनच्या सत्ताधार्‍यांचे बाहुले बनल्याचे निदर्शक असल्याची टीका जनता करीत आहे.

या विधेयकाविरोधात हाँगकाँगमध्ये व्यापक आंदोलन उभे राहिले असून रविवारी झालेल्या निदर्शनांमध्ये लाखो नागरिक सहभागी झाले. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला विरोध करणार्‍या गटांनी हे आंदोलन म्हणजे ‘चीनविरोधातील अखेरचा संघर्ष’ असल्याची हाक दिली आहे.

यापूर्वी २०१४ साली चीनच्या हस्तक्षेपाविरोधात ‘अम्ब्रेला मुव्हमेंट’ नावाने मोठे आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन चीनच्या हाँगकाँगवरील वर्चस्वाला धक्का देणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

हाँगकाँग हा सध्या चीनचा भाग असला तरी त्याचा ताबा सोपविताना ‘वन कंट्री, टू सिस्टिम्स’ हे तत्त्व मान्य करण्यात आले होते. यामुळे हाँगकाँगची राजकीय व्यवस्था चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसारखी नाही. इथली व्यवस्था लोकशाहीच्या खूपच जवळची आहे. त्यामुळे चीन सध्या ‘वन कंट्री, वन सिस्टीम’ धोरणाचा पुरस्कार करून हाँगकाँगला आपल्या संपूर्ण अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याला हाँगकाँगची जनता कडाडून विरोध करीत असून हा विरोध रविवारच्या निदर्शनांमुळे पुन्हा एकदा जगजाहीर झाला. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये झालेल्या ‘तिआनमेन हत्याकांडाला’ तीस वर्षे पूर्ण झाली असून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने केलेल्या या निघृण हत्याकांडाची जगभरातून निर्भत्सना झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, हाँगकाँगमध्ये झालेल्या चीनविरोधी निदर्शनांचे राजकीय महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसते.

आजवर अमेरिकेच्या प्रशासनाने चीनबाबत स्वीकारलेले उदार धोरण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पूर्णपणे बदलले असून तैवानला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. अशा परिस्थितीत हाँगकाँगमध्ये उभे राहिलेले आंदोलन चीनसमोर नवे आव्हान उभे करणारे ठरते. म्हणूनच सध्या तरी हाँगकाँगमधील या निदर्शनांच्या विरोधात आक्रमक कारवाई करणे चीनला महाग पडू शकते. त्याचवेळी हे आंदोलन सुरू राहणे देखील चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info