इस्रायलने सिरियाविरोधात ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ छेडले – सिरियन वृत्तसंस्थेचा आरोप

इस्रायलने सिरियाविरोधात ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ छेडले – सिरियन वृत्तसंस्थेचा आरोप

दमास्कस – सिरियाच्या दक्षिणेकडील लष्करी तळावर इस्रायलने जोरदार हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन लष्कराने केला. इस्रायलचे हे हल्ले परतावून लावण्यासाठी सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केल्याचेही बोलले जाते. पण इस्रायलने ‘इलेक्ट्रॉनिक हल्ल्यां’द्वारे सिरियन रडार यंत्रणा निकामी केली. याचा दाखला देऊन इस्रायलने सिरियाविरोधात ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ छेडल्याचा आरोप सिरियन मुखपत्राने केला.

बुधवारी पहाटे सिरियाच्या दक्षिण सीमेजवळील दारा प्रांतातील पर्वतराजीवर रॉकेट्सचे हल्ले झाले. इस्रायलच्या गोलान टेकड्यांपासून जवळ असलेला सदर भाग सिरियन लष्करासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. म्हणून इस्रायलने या भागातील आपल्या लष्करी तळावर हल्ले चढविल्याची तक्रार सिरियन लष्कर करीत आहे. या हल्ल्यात सिरियन लष्करी तळाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा स्थानिक करीत आहेत.

पण हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर करून इस्रायलचे रॉकेट हल्ले यशस्वीरित्या परतावल्याचे दावेही सिरियन लष्कराने ठोकले आहेत. मात्र सिरियन सरकारच्या अधिकृत वृत्तसंस्थेने याबाबत वेगळीच माहिती दिली. इस्रायली लष्कराने सिरियाविरोधात ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ छेडल्याचा आरोप या वृत्तसंस्थेने केला. सिरियन लष्कराची रडार यंत्रणा निकामी करण्यासाठी इस्रायलने ‘इलेक्ट्रॉनिक’ क्षमतेचा वापर केल्याचे या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

सिरियन लष्कर आणि मुखपत्राने केलेल्या दोन्ही आरोपांबाबत इस्रायलच्या लष्कराने प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या आठवड्यातही सिरियाच्या होम्स प्रांतातील लष्करी तळावर इस्रायलने हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन वृत्तसंस्थेने केला होता. येथील हिजबुल्लाहच्या तळावर तुफानी रॉकेट हल्ले चढवून इस्रायलने हा तळ उद्ध्वस्त केल्याचे मानवाधिकार संघटनेने म्हटले होते. त्यावरही इस्रायलने प्रतिक्रिया दिली नव्हती.

याआधी सिरियातील रशियन बनावटीच्या हवाई सुरक्षा यंत्रणा भेदण्याचा आरोप इस्रायलवर झाला होता. इस्रायली लष्कराने देखील यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध करून सदर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पण सिरियातील संघर्षात पहिल्यांदाच इस्रायलवर ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ छेडल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, सिरियाच्या उत्तरेकडील इदलिब भागात रशियाने दहशतवादी गटांवरील हल्ले सुरू ठेवले आहेत. मंगळवारी रशियन लढाऊ विमानांनी येथील ‘जबाला’ भागात चढविलेल्या हल्ल्यात २५ जण ठार झाले आहेत. तर सिरियन लष्करानेही कबानी येथे रॉकेट्सचा मारा केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info