तुर्की वंशसंहाराची तयारी करीत आहे – सिरियन परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

इरबिल – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी सुमारे ३० लाख सिरियन निर्वासितांसाठी ‘सेफ झोन’ उभारण्याचे जाहीर केले. या सेफ झोनमुळे तुर्की सुरक्षित बनेल, असा दावा तुर्की करीत आहे. पण निर्वासितांसाठी ‘सेफ झोन’ उभारण्याच्या आड तुर्की वंशसंहाराचा कट आखत असल्याचा आरोप सिरियन परराष्ट्रमंत्री वालिद मुअल्लम यांनी केला. त्याचबरोबर, ‘सिरियाचा शेजारी देश म्हणून रहायचे की शत्रू, हे तुर्कीने ठरवावे’, असा इशाराही मुअल्लम यांनी दिला.

गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी सिरियामध्ये ‘सेफ झोन’ उभारण्याची घोषणा केली होती. तुर्कीच्या लष्कराच्या ताब्यात असलेल्या सिरियाच्या ईशान्य सीमेजवळील राक्कामध्ये ५० मैल भूभागात सदर सेफ झोन तयार करण्यात येईल, असे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन म्हणाले होते. शेजारी देशांमध्ये आश्रय घेणार्‍या सिरियन निर्वासितांसाठी सदर सेफ झोन असेल व राक्कापर्यंत मर्यादित असलेले हे क्षेत्र पुढच्या काळात देर अल-झोरपर्यंत वाढविण्यात येईल, असे एर्दोगन आमसभेत म्हणाले होते.

पण सिरियन परराष्ट्रमंत्री मुअल्लम यांनी एर्दोगन यांच्या योजनेवर टीका केली. ‘सिरियन निर्वासितांना पुन्हा मायदेशी आणण्याबाबत एर्दोगन यांनी मांडलेली योजना बनावट आहे. एर्दोगन यांना सिरियन निर्वासितांच्या सुरक्षित माघारीची एवढीच काळजी असती तर त्यांनी सर्वात आधी सिरियातील अस्साद राजवटीशी चर्चा केली असती. एर्दोगन सिरियन निर्वासितांसाठी उभारत असलेले सेफ झोन फक्त वंशसंहारासाठी आहे’, असा ठपका मुअल्लम यांनी ठेवला.

सिरियन परराष्ट्रमंत्र्यांनी तुर्कीला इशाराही दिला. ‘शेजारी देश म्हणून रहायचे की शत्रू म्हणून याचा निर्णय तुर्कीने घ्यायचा आहे’, असे सांगून परराष्ट्रमंत्री मुअल्लम यांनी तुर्कीला लष्करी कारवाईचा इशारा दिला. याआधीही सिरिया व तुर्कीमधील वाद समोर आला होता. सिरियातील अस्साद राजवटीला तुर्कीचा कडवा विरोध आहे. तर दहशतवादविरोधी कारवाई अंतर्गत तुर्की सिरियाच्या उत्तरेकडील भूभागाचा ताबा घेत असल्याचा आरोप सिरिया करीत आहे.

दरम्यान, सिरियन निर्वासितांसाठी सेफ झोन उभारण्यावर पाश्‍चिमात्य देशांचे एकमत झाले नाही तर सिरियात मोठी लष्करी कारवाई करण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी याआधी दिली होती. सदर मुदत पूर्ण झाल्यामुळे येत्या काळात तुर्कीचे लष्कर सिरियात कारवाई करील, असा दावा केला जातो. तर तुर्कीच्या लष्कराने वेळीच सिरियातून चालते व्हावे, असा इशारा याआधीच सिरियन राजवटीने दिला आहे. त्यामुळे सिरियाच्या उत्तरेकडील भागात अस्साद समर्थक लष्कर आणि तुर्कीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info