Breaking News

इराण दहशतवाद्यांना वर्षाकाठी १०० कोटी डॉलर्स पुरवित आहे – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेने लादलेल्या निर्बंधानंतरही इराणने दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याचे थांबविलेले नाही. अजूनही इराणकडून दहशतवाद्यांना वर्षाकठी एक अब्ज डॉलर्सचे सहाय्य पुरविले जाते’, असा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अहवालात केला. लेबेनॉन, इराक, येमेन आणि गाझापट्टीमधील दहशतवादी संघटनांना इराण सहाय्य पुरवित असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर अफगाणिस्तान आणि सिरियातील अल कायदाच्या कारवायांना देखील इराणचेच सहाय्य मिळत असल्याचा ठपका यात ठेवला आहे.
         

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी ‘द कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिझम २०१८’ हा अहवाल प्रसिद्ध केले. परराष्ट्र मंत्रालयातील दहशतवादविरोधी विभागाचे उपमंत्री असलेल्या नॅथन सेल्स यांनी यासंबंधी दिलेल्या माहितीत, इराण हा दहशतवादाचा सर्वात मोठा समर्थक व सहाय्यक देश असल्याचा आरोप केला. आखातातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी इराणने हिजबुल्लाह, हमास, इस्लामिक जिहाद, हौथी बंडखोर यासारख्या दहशतवादी संघटना तसेच इराकमधील गटांना १०० कोटी डॉलर्स पुरविल्याचे या अहवालात म्हटले आहे.

‘याबरोबरच इराणने युरोपिय देशांमध्येही दहशतवादी हल्ले घडविले. जानेवारी महिन्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुद्स फोर्सेस’चा सहभाग जर्मनीतील दहशतवादी कारवायांमध्ये होता. जर्मनीच्या यंत्रणांनी केलेल्या तपासात ही माहिती उघड झाले. तर पॅरिसमधील राजकीय विरोधकांच्या बैठकीवर हल्ल्याचा कटातही इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स सहभागी असल्याचे बेल्जिअम, फ्रान्स व जर्मनीच्या यंत्रणांनी म्हटले होते. या व्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये डेन्मार्क आणि डिसेंबर महिन्यात अल्बानियातही इराणशी निगडीत असलेल्या दहशतवादी गटांचे कट उघड झाले होते’, याकडे सदर अहवालाने लक्ष वेधले.

‘९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अल कायदाच्या कारवायांना चाप लावण्यात यश मिळविले होते. पण इराणने अल कायदाला आपल्या देशात आश्रय दिला व आर्थिक मदत तसेच शस्त्रास्त्रेे पुरवून अफगाणिस्तान व सिरियात हातपाय पसरण्यास सहाय्य केले’, असा आरोप या अहवालात करण्यात आला?आहे. इराणच्या या दहशतवादसमर्थक कारवायांवर आळा घालण्यासाठी अमेरिकेने कठोर निर्बंध लादले खरे. पण या निर्बंधांनंतरही इराणने दहशतवादाला सहाय्य देण्याचे थांबवलेले नाही, असा दावा सदर अहवालात करण्यात आला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info