Breaking News

अफगाणिस्तानात संघर्षबंदी करणार असतील तरच अमेरिका तालिबानशी चर्चा करील – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

काबुल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानाला आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांनी तालिबानबरोबरील अमेरिकेच्या चर्चेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ‘अमेरिका तालिबानशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण त्याआधी तालिबानने अफगाणिस्तानात संघर्षबंदी लागू करावी. तालिबानला अशी संधी पुन्हा मिळणार नाही’, असा सज्जड इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. तालिबानने मात्र अमेरिकेबरोबर चर्चेबाबत इतक्यात काही सांगता येणार नाही, असे जाहीर केले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, संघर्षबंदी, अश्रफ गनी, तालिबान, चर्चा, अफगाणिस्तान, इराण

पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या भेटीवर असलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बागराम लष्करी तळावर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्राध्यक्ष गनी यांनी ट्रम्प यांच्यासमोर आपल्या सरकारची बाजू मांडली. तर तालिबानबरोबर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले. यानंतर लष्करी तळावरील अमेरिकी सैनिकांशी बोलताना देखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तालिबानबाबत कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, संघर्षबंदी, अश्रफ गनी, तालिबान, चर्चा, अफगाणिस्तान, इराण‘अफगाणिस्तानात ८६०० किंवा त्याहून कमी सैनिक तैनात राहतील. यासाठी अमेरिका काम करीत आहे. अमेरिकेच्या या सैन्यतैनातीबाबत तालिबानला चर्चा करायची आहे. पण त्याआधी त्यांनी संघर्षबंदी लागू करावी’, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली. तसेच ‘तालिबान संघर्षबंदीसाठी तयार असेल तर अमेरिका ही संघर्षबंदी कायम ठेवील. पण तालिबानच यासाठी तयार नसेल तर त्यांना अशी संधी पुन्हा कधीच मिळणार नाही’, असे सूचक उद्गार काढून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तालिबानला नवा इशारा दिला.

याआधीही अमेरिकेने तालिबानबरोबर वाटाघाटी सुरू केल्या होत्या. पण अमेरिकेबरोबर चर्चा सुरू असताना तालिबानने अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले सुरू ठेवले होते. आपल्या हल्ल्यात तालिबानने जनतेबरोबरच लष्कर आणि अमेरिकी सैनिकांना लक्ष्य केले होते. तालिबानच्या या हल्ल्यांवर टीका करून अमेरिकेने सदर चर्चेतून माघार घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर, तालिबानसोबत चर्चा सुरू करण्याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तालिबानला संघर्षबंदीच्या शर्तीची आठवण करून दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तालिबानचा वरिष्ठ कमांडर मुल्ला बरादर याने इराणचा दौरा करून परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांची भेट घेतली होती या भेटीत अमेरिकेला अफगाणिस्तानातून हाकलून लावण्यावर इराण व अफगाण तालिबानचे एकमत झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तालिबानला परिणामांची नेमक्या शब्दात जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info