तुर्कीने सिरियाची दोन विमाने पाडली – सिरियन लष्कराचे प्रतिहल्ले सुरू

तुर्कीने सिरियाची दोन विमाने पाडली – सिरियन लष्कराचे प्रतिहल्ले सुरू

अंकारा/दमास्कस – गेल्या चोवीस तासात तुर्कीने सिरियन लष्करावर चढविलेल्या हल्ल्यांमध्ये दोन लढाऊ विमाने पाडली तर हवाई सुरक्षा यंत्रणाही उद्ध्वस्त केली. आपल्या या हल्ल्यात सिरियन लष्कराचे वैमानिक ठार झाल्याचा दावा तुर्की करीत आहे. तर आपले सैनिक सुरक्षित असून तुर्कीला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा सिरियाने केली आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे सिरिया व तुर्कीच्या लष्करात थेट संघर्ष भडकण्याची स्थिती निर्माण झाल्याचा दावा केला जातो.

     

काही तासांपूर्वी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर केलेल्या चर्चेत नरमाईचे सूर लावले होते. रशियाने सिरियाचे हल्ले थांबवून इदलिबमध्ये संघर्षबंदी लागू करावी, असे आवाहन तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सिरियन लष्करावर हल्ले सुरू असताना रशियाने दूर रहावे, अशी मागणी केल्याचे वृत्त तुर्कीचे मुखपत्र व सरकारी वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्याचबरोबर तुर्कीच्या लष्कराने सिरियामध्ये ‘ऑपरेशन स्प्रिंग फिल्ड’ ही लष्करी मोहीम देखील घोषित केली.

या मोहिमेच्या पहिल्या चोवीस तासात तुर्कीने सिरियाची दोन ‘सुखोई-२४’ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. या कारवाईत सिरियाचे विमान कोसळून वैमानिक ठार झाल्याचा दावा तुर्कीची माध्यमे करीत आहेत. यासंबंधीचा एक व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे. पण आपल्या दोन्ही विमानांचे वैमानिक व सहवैमानिक सुरक्षित असल्याचे सिरियन लष्कराने सांगितले. या व्यतिरिक्त सिरियाच्या उत्तरेकडील भागात तैनात हवाई सुरक्षा यंत्रणाही नष्ट केल्याचे तुर्कीच्या लष्कराने जाहीर केले.

काही तासांपूर्वी सिरियन लष्कराने तुर्कीचे टेहळणी विमान पाडले होते. तसेच सिरियन लष्कराने इदलिबमध्ये चढविलेल्या हवाई हल्ल्यात तुर्कीचे ३४ सैनिक मारले गेले होते. याचा सूड घेण्यासाठी सिरियाच्या लष्करावर हे हल्ले चढविल्याचे तुर्कीने जाहीर केले. या हल्ल्यानंतर सिरियाने इदलिबची हवाईहद्द बंद केल्याचे घोषित केले. तसेच आपल्या हवाईहद्दीचे उल्लंघन करणार्‍या विमानाला, मग ते कुठल्याही देशाचे असले तरी, ते नष्ट केले जाईल, असा इशारा सिरियन लष्कराने दिला.

इदलिबमधील सिरियन लष्करावर हवाई हल्ले सुरू असताना तुर्कीची लष्करी वाहने, रणगाडे सिरियाच्या हद्दीत दाखल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसात तुर्कीने सिरियात रवाना केलेली ही सर्वात मोठी लष्करी कुमक असल्याचा दावा केला जातो. ही लष्करी कुमक व हवाई हल्ल्यांची तीव्रता लक्षात घेता येत्या काळात सिरिया व तुर्कीच्या लष्करात मोठा संघर्ष भडकण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, सिरियन लष्कराने इदलिबमध्ये सुरू केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईला तुर्कीचा विरोध आहे. मात्र इदलिबवर कारवाई करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या सिरियन राजवटीला असल्याचे सांगून रशियाने सिरियाच्या कारवाईचे समर्थन केले. तर तुर्की देखील सिरियन लष्करावरील हल्ल्यांवर ठाम आहे. तुर्कीच्या या कारवाईवर सिरिया तसेच रशिया कोणती भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info