अमेरिकेचा डॉलर व आर्थिक वर्चस्व झुगारण्यासाठी इस्लामधर्मिय देशांची स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी हवी – इराणच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी

अमेरिकेचा डॉलर व आर्थिक वर्चस्व झुगारण्यासाठी इस्लामधर्मिय देशांची स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी हवी – इराणच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी

कौलालांपूर – अमेरिकेचा डॉलर आणि अमेरिकेच्या आर्थिक वर्चस्वाला काटशह द्यायचा असेल, तर त्यासाठी इस्लामधर्मिय देशांच्या स्वतंत्र क्रिप्टोकरन्सीची गरज आहे, अशी लक्षवेधी मागणी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली. तसे झाल्यास आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकेच्या डॉलरचा प्रभाव संपविता येईल, असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सुचविले. तर मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी आपण इस्लामिक चलनाची मागणी केली होती, याची आठवण करून दिली.
मलेशियाची राजधानी कौलालांपूरमध्ये इस्लामधर्मिय देशांची परिषद सुरू आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची आर्थिक मक्तेदारी झुगारून देण्याची आवश्यकता अत्यंत आक्रमकपणे मांडली. सध्या इराण अमेरिकेच्या कडक निर्बंधांचा सामना करीत असून यामुळे इंधनसंपन्न असलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेसमोर फार मोठी आव्हाने उभी राहिलेली आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या डॉलर तसेच आर्थिक वर्चस्वाला धक्का देण्याची इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली मागणी स्वाभाविक ठरते.
‘‘याआधी मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी ‘सोन्याचा दिनार’ चलन म्हणून वापरावा असे सुचविले होते. आत्ताच्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून इस्लामधर्मिय देशांनी आपल्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर सुरू करावा’’, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. तसेच या क्रिप्टोकरन्सीचा वापर तंत्रज्ञान, संशोधन आणि विकासासाठी करता येईल, असा प्रस्तावही राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी दिला. त्यांच्या या प्रस्तावाला मलेशियाच्या पंतप्रधानांनी तिथल्या तिथेच समर्थन दिले. आपण कित्येक वर्षांपूर्वी इस्लामी देशांच्या स्वतंत्र चलनाची मागणी केली होती. पण त्यावेळी महासत्तांनी आमच्या विरोधात कारवाई केली होती, असे महाथिर मोहम्मद म्हणाले.
यावेळी मात्र मलेशियाने इस्लामधर्मिय देशांच्या स्वतंत्र चलनासाठी प्रयत्न करावे. तुर्की आणि इराणसारखे प्रबळ देश यासाठी पाठिंबा देत आहेत, त्याचा लाभ घेऊन इस्लामी देशांचे स्वतंत्र चलन विकसित करता येईल, असे महाथिर मोहम्मद पुढे म्हणाले. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र चलनाबरोबरच इस्लामधर्मिय देशांनी स्वतंत्रपणे निधी उभारावा व ‘इस्लामिक प्रॉस्पॅरिटी फंड’ विकसित करावा, अशी मागणी उचलून धरली आहे.
वेगळ्या शब्दात कौलालांपूर परिषदेत इस्लामधर्मियांच्या स्वतंत्र राजकारण व अर्थकारणाचा पुरस्कार करण्यात येत असून पुढच्या काळात याचे फार मोठे दूरगामी परिणाम संभवतात. अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देश इस्लामधर्मियांच्या एकजुटीच्या विरोधात असून त्यांचा आर्थिक विकासही रोखत आहेत, असा सूर या परिषदेत लावण्यात आला आहे. असे असले तरी या परिषदेत सौदी अरेबिया तसेच सौदीचे आखातातील प्रबळ मित्रदेश या परिषदेपासून अंतर ठेवून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी या परिषदेचे स्वरुप अमेरिका व सौदीविरोधी देशांचे संघटन असेच असल्याचे दिसते. पण पुढच्या काळात कौलालांपूर परिषदेचा प्रभाव वाढेल, अशी दाट शक्यता काही इस्लामधर्मिय विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info