Breaking News

…तर इराकवर इराणहून अधिक कठोर निर्बंध लादू – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खरमरीत इशारा

वॉशिंग्टन – आपल्या देशातील अमेरिकेचा लष्करी तळ बंद करून येथील अमेरिकी सैनिकांना देशाबाहेर काढण्याचा ठराव इराकच्या संसदेत एकमताने संमत करण्यात आला. या निर्णयावर संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर शब्दात इराकी नेत्यांना खडसावले. ‘अमेरिकी सैन्य इराकमधून माघार घेणार नाही. तसे करायचे असेल तर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळासाठी झालेला अब्जावधी डॉलर्सचा खर्च चुकता करा. यानंतरही अमेरिकेला लष्करी तळ सोडून जाण्यास सांगितले गेले तर इराणवरील निर्बंध मवाळ वाटतील, इतके कठोर निर्बंध अमेरिका इराकवर लादेल’, असा सज्जड इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

इराकच्या संसदेत अमेरिकन सैनिकांना आपल्या देशातून बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करून इराकच्या संसदेने अमेरिकन सैन्याने इराकमधून काढता पाय घ्यावा, असे बजावले. इराणसमर्थक अशी ओळख असलेले इराकचे पंतप्रधान अदेल महदी यांनी अमेरिकेच्या इराकमधील सैन्यमाघारीचे जोरदार समर्थन केले. मात्र यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया उमटली.

‘अमेरिकेने इराकमध्ये फार मोठी गुंतवणूक करून हवाईतळ उभारला आहे. यासाठी अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सचा खर्च करावा लागला. त्यामुळे इराक या अब्जावधी डॉलर्सच्या खर्चाची परतफेड करीत नाही तोपर्यंत अमेरिका इराकमधून बाहेर पडणार नाही. यानंतरही जर अमेरिकेला बाहेर पडण्यास सांगण्यात आलेच, तर इराणवरील अमेरिकेचे निर्बंध मवाळ वाटतील, इतके कठोर निर्बंध अमेरिका इराकवर लादेल’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले.

या व्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला देखील धमकावले. ‘इराणने अमेरिकन नागरिकांची हत्या केलेली चालते. त्यांनी आमच्या नागरिकांचा छळ आणि लुळपांगळे केलेले चालते. रस्त्यावर बॉम्बहल्ले घडवून आमच्या नागरिकांना ठार केलेलेही चालते. पण आम्ही त्यांच्या सांस्कृतिक केंद्रांवर हल्ला करायचा नाही? हे खपवून घेता येणार नाही’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापुढेही इराणच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाईल, याची जाणीव करून दिली.

दरम्यान, इराकचे पंतप्रधान माहदी आणि इतर नेत्यांनी अमेरिकाविरोधी भूमिका स्वीकारली असून त्यांना काही प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. पण इराकमधील काहीजणांनी अमेरिकेची बाजू उचलून धरली असून इराणला कडाडून विरोध केला आहे. गेल्या दहा वर्षाच्या कालावधित इराणने इराकवरील आपले वर्चस्व प्रमाणाच्या बाहेर वाढविले असून याला इराकी जनतेचा विरोध आहे. इराकमधील एकेकाळचे कट्टर इराणसमर्थक अशी ओळख असलेले शियापंथीयांचे नेते मुक्तदा अल-सद्र यांनीही सुलेमानी व मुहानदिस ठार झाल्यानंतर तरी, इराकींनी आपला देश वाचविण्यासाठी तयार रहावे, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे इराकमधील इराणसमर्थक सरकारच्या निर्णयाला इराकमधूनच आव्हान मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info