Breaking News

नाटोच्या विस्तारात आखाती देशांचा समावेश हवा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अमेरिका व इराणमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर नाटोने आपल्या विस्तारात आखाती देशांवर लक्ष देऊन त्यांचा समावेश करावा, अशी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांच्याबरोबर फोनवर झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी ही मागणी केल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही नाटोप्रमुखांशी याच मुद्यावर चर्चा केली असून नाटोने त्याला दुजोरा दिला आहे. यापूर्वी २०१८ साली ट्रम्प यांनी इराणविरोधात ‘अरब नाटो’ उभारण्याचे प्रयत्न केले होते.

इराणचे लष्करी नेते जनरल सुलेमानी यांच्यावरील कारवाईनंतर आखातातील तणाव प्रचंड वाढला असून संघर्ष पेटण्याचे संकेत देण्यात येत आहेत. सुलेमानी यांच्यावरील कारवाईनंतर इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे हल्ले चढविले आहेत. इराकमधील इराणसमर्थक संघटनांनी दोनदा अमेरिकेच्या दूतावासावर रॉकेट हल्लेही केले आहेत.

मात्र त्याला अमेरिकेने लष्करी प्रत्युत्तर न देता इराणविरोधात कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी यापुढे इराणविरोधात मोठ्या संघर्षासाठी अमेरिका सक्षम असली तरी त्यात युरोप व इतर मित्रदेशांना सहभागी करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘नाटो’सारख्या लष्करी संघटनेत आखाती देशांना सहभागी करून घेण्याची मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.

नाटोचे प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांच्याबरोबर फोनवर झालेल्या चर्चेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आखाती देशांच्या सहभागानंतर नव्या गटाचे नावे ‘नाटोम’ किंवा ‘नाटो प्लस एमई’ असे ठेवण्याचेही संकेत दिले. ‘नाटोचा विस्तार व्हायला हवा व त्यात आखातातील देशांचा समावेश होणे आवश्यक आहे. आखातातील तणाव ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे आता नाटोने आखातातील सुरक्षेची जबाबदारी उचलायला हवी’, अशा शब्दात ट्रम्प यांनी नाटोच्या विस्ताराची मागणी केली.

नाटोने जबाबदारी घेतल्यास अमेरिकेला मोठ्या प्रमाणात सैन्य मायदेशी बोलविता येईल, असा दावाही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला. नाटोने आखातातील ‘आयएस’विरोधी संघर्षाकडेही प्राधान्याने लक्ष द्यायला हवे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेने ‘आयएस’चा पराभव करून युरोपला दिलासा मिळवून दिला आहे, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर नाटोकडूनही स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात प्रादेशिक स्थैर्य व आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात नाटोने सक्रिय भूमिका घ्यावी, असे ठरल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नाटोचे प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांनी गुरुवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्याशी चर्चा केल्याचेही समोर आले आहे. यातही नाटो व आखातातील नाटोची भूमिका या मुद्यावर बोलणी झाल्याची माहिती पॉम्पिओ यांनी दिली. गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी, नाटोने सौदी तसेच इतर अरब देशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले होते.

२०१७ साली ट्रम्प यांच्या पुढाकाराने अरब-इस्लामी देशांची बैठक घेण्यात आली होती. दहशतवादविरोधी संघर्षासाठी अरब-इस्लामी देशांची संयुक्त संघटना उभारण्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले होते. त्यानंतर ‘मिडल ईस्ट स्ट्रॅटेजिक अलायन्स’ (एमईएसए-मेसा) करारही करण्यात आला होता. अरब देशांची ‘मेसा’ ही संघटना इराणची आक्रमकता, दहशतवाद, कट्टरवाद यांच्याविरोधात तटबंदीसारखे काम करील आणि या क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित करील, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info