Breaking News

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उपस्थितीत रशियाकडून ‘ब्लॅक सी’ व क्रिमिआत हायपरसोनिक अण्वस्त्राची चाचणी

मॉस्को – आखातात इराणच्या मुद्यावर तणाव वाढत असतानाच रशियानेही आपल्या संरक्षणसज्जतेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. इराण व चीनबरोबरील संयुक्त नौदलसरावापाठोपाठ रशियाने ‘ब्लॅक सी’ क्षेत्रात नव्या सरावाला सुरुवात केली. या सरावादरम्यान गुरुवारी ‘किन्झाल’ या प्रगत हायपरसोनिक अण्वस्त्राबरोबरच ‘कॅलिबर’ या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उपस्थितीत पार पडल्या असल्याने लक्ष वेधून घेणार्‍या ठरल्या आहेत.

गेल्या दोन वर्षात रशियाकडून सातत्याने प्रगत अण्वस्त्रे तसेच क्षेपणास्त्रांच्या आधुनिक आवृत्त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेबरोबरील ‘आयएनएफ’ हा क्षेपणास्त्र करार तुटल्यानंतर या चाचण्यांना अधिकच वेग आला आहे. रशिया सध्या वेगवान तसेच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांना सहज चकवा देऊ शकणार्‍या ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रांचा विकास व निर्मितीवर विशेष भर देत असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही त्याबाबत वारंवार ग्वाही दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रात तसेच क्रिमिआनजीक घेण्यात आलेल्या चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. रशियाने या क्षेत्रात सुरू केलेल्या सरावात तब्बल ३० युद्धनौका, ४० लढाऊ विमाने व एक पाणबुडी सहभागी झाली आहे. यातील ‘मिग-३१के इंटरसेप्टर’ लढाऊ विमानांवरून ‘किन्झाल’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. ध्वनीच्या १० पट वेग असणार्‍या या अण्वस्त्राची क्षमता तब्बल दोन हजार किलोमीटर्सपर्यंत असल्याचे सांगण्यात येते.

याव्यतिरिक्त ‘कॅलिबर’ या क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचण्याही घेण्यात आल्या असून विनाशिका तसेच पाणबुडी अशा दोन्ही प्रकारात चाचण्या घेण्यात आल्याची माहिती रशियन सूत्रांनी दिली. ‘कोल्पिनो’ पाणबुडीतून पाण्याखालून करण्यात आलेली चाचणी महत्त्वाची असल्याचा दावाही करण्यात आला. ‘कॅलिबर’ क्षेपणास्त्रात चार हजार किलोमीटर्सहून अधिक पल्ला गाठण्याची क्षमता असून ती यापूर्वीच रशियन संरक्षणदलात सामील करण्यात आली आहेत.

नौदल सरावातील दोन्ही चाचण्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती रशियन संरक्षणदलाने दिली. पुतिन यांच्या उपस्थितीत संरक्षणदलाने घेतलेल्या चाचण्या ही महत्त्वाची घटना असून त्यातून रशियाने योग्य तो संदेश दिल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info