Breaking News

अमेरिका आणि इस्रायल संयुक्तरित्या आखातातील इराणचा प्रभाव रोखणार – इस्रायलचे संरक्षणमंत्री नफ्ताली बेनेट

तेल अविव – ‘आखातातील इराणचा वाढता प्रभाव रोखणे, हे अमेरिका आणि इस्रायलचे उद्दिष्ट आहे. यासाठी दोन्ही देशांनी आपापली जबाबदारी वाटून घेतली आहे. अमेरिका इराकमध्ये तर इस्रायल सिरियामध्ये इराणला रोखणार आहे’, अशी घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांनी केली. त्याचबरोबर, ‘इराणला सिरियातून बाहेर काढेपर्यंत इस्रायलचे हल्ले थांबणार नाहीत’, असे सांगून संरक्षणमंत्री बेनेट यांनी सिरियातील इराणच्या लष्करी तळांवरील कारवाईची कबुली दिली.

गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. यावेळी अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, पेंटॅगॉनला दिलेल्या भेटीत बेनेट यांनी अमेरिकी संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी इराण, सिरिया व आखातातील इतर मुद्यांवर चर्चा केली. इराणने इराक व सिरियामध्ये मोठे प्रभावक्षेत्र निर्माण केले आहे, यावर अमेरिका व इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच इराणचे हे प्रभावक्षेत्र नष्ट करण्यासाठी अमेरिका व इस्रायलने आपापली जबाबदारी वाटून घेण्याचे मान्य केले, असेही बेनेट यांनी सांगितले.

त्याचबरोबर गेल्या आठवड्यात सिरियन राजधानी दमास्कस जवळच्या इराणच्या तीन लष्करी तळांवर चढविलेल्या हल्ल्याची कबुलीही इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी दिली. ‘इस्रायलने सिरियातील इराणच्या प्रभावाविरोधात मोठी कारवाई हाती घेतली आहे. सिरियातील इराणचे लष्करी तळ, हवाई सुरक्षा यंत्रणा, क्षेपणास्त्रे, इराणचे दहशतवादी, सिरियातील इराणसंलग्न गट यांना लक्ष्य करून इराणला कमकुवत करण्याचे इस्रायलचे उद्दिष्ट आहे’, असे बेनेट म्हणाले.

‘ऑक्टोपसच्या आठ हातांशी लढण्यामध्ये स्वत:ची शक्ती खर्च करण्यात अर्थ नाही. अशाप्रकारच्या संघर्षात ऑक्टोपसचे डोके नेहमीच सुरक्षित असते. म्हणून ऑक्टोपसच्या आठ हातांशी लढण्यापेक्षा थेट त्याचे डोके ठेचणे, अर्थात इराणच्या सामर्थ्यावर हल्ले चढविणे योग्य ठरते. यासाठी उद्याच इराणबरोबर थेट युद्ध पुकारण्याची गरज नाही. शीतयुद्धात अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये ज्याप्रकारे संघर्ष सुरू होता, अगदी त्याचप्रकारे इराणच्या वर्मावर हल्ले चढविणे योग्य ठरेल’, असे सांगून संरक्षणमंत्री बेनेट यांनी सिरियातील इराणच्या ठिकाणांवरील इस्रायलच्या हल्ल्यामागची भूमिका स्पष्ट केली.

‘परदेशी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरियातील इराणच्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात २३ इराणी ठार झाले. ही एक मोठी संख्या असून सिरिया जोपर्यंत इराणसाठी व्हिएतनाम ठरत नाही, तोपर्यंत असे हल्ले सुरूच राहतील’, असा इशारा इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी दिला. त्याचबरोबर इस्रायलच्या शेजारी असलेल्या सिरियातील इराणच्या प्रभावावर हल्ले चढविणे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचा दावा बेनेट यांनी केला.

‘इराण, इराक, सिरिया आणि लेबेनॉन, हे एक घातक कोडे आहे. हे सारे देश एका पाईपलाईनने एकमेकांशी जोडलेले. ही पाईपलाईन म्हणजे रॉकेट्स आणि दहशतवादी. त्यामुळे ही पाईपलाईनच उद्ध्वस्त करून टाकली तर इराणचा प्रभाव वाढणार नाही. म्हणून इराक आणि सिरियातील इराणच्या प्रभावावर हल्ले चढविणे आवश्यक ठरते’, असे बेनेट यांनी इस्रायली वर्तमानपत्राशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, इराणच्या विरोधात थेट संघर्ष पुकारण्याऐवजी इराणचा प्रभाव असणार्‍या देशातील इराणसंलग्न गटांवर हल्ले चढविणे सोपे असल्याचे इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी यावेळी लक्षात आणून दिले. तर इराणसंलग्न हमास आणि हिजबुल्लाहविरोधात संघर्षासाठी इस्रायली सैनिकांना गाझापट्टी आणि लेबेनॉनमध्ये रवाना करण्याच्या योजनेच्या विरोधात असल्याचा दावा बेनेट यांनी केला. कारण अशा प्रकारच्या युद्धात इस्रायलला आपले सैनिक गमवावे लागतात, ही बाब बेनेट यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info