चीन कोरोनाव्हायरसबाबतची खरी माहिती दडवित आहे – अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची घणाघाती टीका

चीन कोरोनाव्हायरसबाबतची खरी माहिती दडवित आहे – अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची घणाघाती टीका

वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोनाव्हायरसची साथ ९७ देशांमध्ये पसरली असून याची लागण झालेल्यांची संख्या एक लाखाच्या पलीकडे गेली आहे. तर कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या तीन हजारांच्याही पुढे गेली आहे. अमेरिकेतही या साथीने १७ जणांचा बळी घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र जगभरात ही साथ थैमान घालत असताना, चीन मात्र याबाबतची खरी माहिती व आकडेवारी देत नाही, अशी तक्रार करून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर सडकून टीका केली आहे. अशा काळातही चीन सहकार्य करायला तयार नसल्याचे सांगून पॉम्पिओ यांनी ही निराश करणारी बाब असल्याचा ठपका ठेवला.

कोरोनाव्हायरसच्या साथीचा जगभरात भयावहरित्या फैलाव सुरू झालेला असून अशा देशांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. अवघ्या काही दिवसातच या साथीने प्रवेश केलेल्या देशांमधील परिस्थिती भयावह करून सोडल्याचे दिसत आहे. जगभरात या साथीची लागण झालेल्यांची संख्या १,०२,८६३ वर पोहोचली आहे. यात चीनमधल्या ८०,६५१ रुग्णांचा समावेश आहे. तर चीनमध्ये या साथीने घेतलेल्या बळींची संख्या ३५०६ वर गेली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात या साथीमुळे चीनमध्ये २८ जण दगावल्याचे सांगितले जाते. हे सारे बळी चीनच्या वुहानमध्येच गेल्याची माहिती दिली जात आहे.

अमेरिकेतही कोरोनाव्हायरसने प्रवेश केला असून आत्तापर्यंत अमेरिकेत या साथीने १७ जणांचा बळी घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अमेरिकेने ही साथ रोखण्यासाठी तातडीने ८.३ अब्ज डॉलर्सची तरतूद घोषित केली. मात्र ही साथ रोखण्यासाठी चीनकडून अमेरिकेला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली आहे. एका अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी चीन कोरोनाव्हायरसबाबतची माहिती दडपून ठेवत आहे व याची खात्रीलायक आकडेवारी देखील जाहीर करीत नाही, असा आरोप केला. चीनच्या राजवटीची ही भूमिका निराश करणारी असल्याची टीका पॉम्पिओ यांनी केली आहे. इतर पाश्‍चिमात्य देश व माध्यमांकडूनही चीनवर असेच आरोप केले जात आहे.

दरम्यान, चीनची राजवट कोरोनाव्हायरसची साथ चीनमधून नाही, तर दुसर्‍या देशातून चीनमध्ये आल्याचे संकेत देऊ लागली आहे. याद्वारे आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात असल्याचे दिसते. याची दखल घेऊन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही साथ चीनमधूनच पसरल्याचे ठासून सांगितले. इतर कोण काय बोलते, यापेक्षाही चीनची कम्युनिस्ट राजवट काय सांगते, याला सर्वाधिक महत्त्व आहे. चीनच्या राजवटीने ही साथ आपल्याच देशातून बाहेर आल्याचे मान्य केले आहे, याकडे पॉम्पिओ यांनी लक्ष वेधले. मात्र जगातील दुसरा कुठलाही देश ही समस्या हाताळेल, त्यापेक्षा अमेरिका कितीतरी चांगल्या पद्धतीने या समस्येचा सामना करील, असा विश्‍वास परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी व्यक्त केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info