अखेर ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडला स्कॉटलंडकडून वेगळे संकेत

अखेर ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडला स्कॉटलंडकडून वेगळे संकेत

लंडन – तब्बल ४७ वर्षे युरोपिय महासंघाचा सदस्य राहिलेला ब्रिटन शुक्रवारी रात्री अखेर महासंघातून बाहेर पडला. या घटनेने गेल्या ४० महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी अनिश्‍चितता संपल्याचे मानले जाते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’ची ही घटना ब्रिटीश जनतेसाठी आशेचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी ब्रिटनचा भाग असलेल्या स्कॉटलंडने वेगळे संकेत देऊन आपण महासंघाचा भाग होण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

जून २०१६मध्ये ब्रिटनमध्ये युरोपिय महासंघातील सदस्यत्त्वाच्या मुद्यावर सार्वमत घेण्यात आले होते. या सार्वमतात ब्रिटीश जनतेने अनपेक्षितरित्या युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचा कौल दिला होता. ब्रिटीश जनतेच्या या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय समुदायातून संमिश्र पडसाद उमटले होते. या सार्वमतानंतर ब्रिटनमध्ये उघडपणे दोन तट पडल्याचे पहायला मिळाले होते. एक गट युरोपिय महासंघाशी जवळिक कायम राखण्यासाठी हालचाली करीत होता. त्याचवेळी दुसरा गट ब्रिटनच्या भविष्यासाठी ‘ब्रेक्झिट’ आवश्यक असल्याचे आक्रमकरित्या मांडत होता.

सार्वमतानंतर अवघ्या तीन वर्षात ब्रिटनच्या दोन पंतप्रधानांना ‘ब्रेक्झिट’च्या अपयशासाठी राजीनामे देणे भाग पडले. मात्र बोरिस जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट होणारच’ या भूमिकेवर ठाम राहून बहुमत मिळवित ब्रिटीश जनतेने दिलेल्या निर्णयाचा आदर राखण्यात यश मिळविले. ‘ब्रिटनमधील जनतेला राजकीय गुंतागुंतीमुळे ब्रेक्झिट कधीच शक्य होणार नाही, असे वाटू लागले होते. पण माझे काम देशाला पुढे घेऊन जाण्याचे आहे’, अशा शब्दात पंतप्रधान जॉन्सन यांनी ब्रेक्झिट यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शुक्रवारी युरोपिय महासंघातून ब्रिटन बाहेर पडत असताना ब्रिटनसह युरोपिय महासंघातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पहायला मिळाले. राजधानी लंडनसह ब्रिटनच्या अनेक भागांमध्ये ब्रिटनचे ध्वज फडकावित, गाणी म्हणत जल्लोष सुरू होता. त्याचवेळी ब्रिटनचाच एक भाग असलेल्या स्कॉटलंडमधून मात्र वेगळे सूर उमटले. स्कॉटलंडच्या नेत्या निकोला स्टर्जन यांनी पुन्हा स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचा उल्लेख करून स्वतंत्र स्कॉटलंडचे भविष्य युरोपिय महासंघाबरोबर असेल, अशा शब्दात महासंघाशी असलेली जवळिक दाखवून दिली.

महासंघातील प्रमुख सदस्य देश असलेल्या फ्रान्सने ब्रेक्झिटची घटना हा ऐतिहासिक संदेश असून यापुढे महासंघात मोठे बदल घडविणे आवश्यक आहे, असे म्हंटले. तर जर्मनीने खंत व्यक्त करतानाच ब्रिटनचा निर्णय स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी ब्रिटन महासंघातून बाहेर पडला असला तरी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंतचा काळा हा ‘ट्रान्झिशन’चा कालावधी म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे.

English    हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info