Breaking News

इराकच्या नव्या सरकारला निदर्शकांचा इशारा

बगदाद – ‘आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा इराकच्या सर्व शहरांमध्ये निदर्शने पेट घेतील. इराणच्या हातातील बाहुले असलेल्या पंतप्रधान कधीमी यांच्या सरकारला आम्ही १० दिवसांची मुदत देत आहोत’, असा इशारा इराकी निदर्शकांनी आपल्या नव्या सरकारला दिला. त्याचबरोबर या निदर्शकांनी इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात घोषणाही दिल्या आहेत. इराकमधील इराणसंलग्न गटांनी या निदर्शकांवर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहेत.

चार दिवसांपूर्वी इराकमध्ये नवे सरकार स्थापन करण्यात आले असून पंतप्रधान म्हणून ‘मुस्तफा अल-कधीमी’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इराकी संसद तसेच ‘मुक्तदा अल-सद्र’, ‘हादी अमेरी’ या प्रबळ नेत्यांच्या समर्थनानंतर कधीमी यांची निवड झाली. पण पुढच्या काही तासातच इराकी निदर्शकांनी राजधानी बगदादच्या ‘तेहरीर चौका’त उतरुन कधीमी सरकारचा निषेध केला. बगदादप्रमाणे बसरा, दिवानियाह, धी-कार, बाबिल, करबला, मयासान, वासित आणि इतर शहरांमध्ये सरकारविरोधी निदर्शनाचे लोण पसरले.

याआधीच्या सरकारप्रमाणे कधीमी देखील इराणच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप या निदर्शकांनी केला. ‘कधीमी यांनी आपली योग्यता सिद्ध करावी व त्यासाठी इराकी जनतेच्या मागण्या मान्य कराव्या. यासाठी कधीमी यांना दहा दिवसांची मुदत देत आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सरकार सोडण्याची तयारी ठेवा’, असा इशारा निदर्शकांच्या नेत्याने दिला. इराकमध्ये निवडणूक घेण्यात यावी आणि या निवडणुकीतील उमेदवारांवर कुठल्याही देशाचा प्रभाव नसावा, अशी आग्रही मागणी हे निदर्शक करीत आहे. यावेळी काही निदर्शकांनी मुक्तदा अल-सद्र, हादी अमेरी आणि इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

इराकी सुरक्षा रक्षकांनी बगदादमधील निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर केला. तर बसरा प्रांतात इराणसंलग्न ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ सशस्त्र गटाने निदर्शकांवर गोळीबार केला. काही ठिकाणी निदर्शकांनी इराणसंलग्न गटांच्या ठिकाणांवर हल्ले चढविल्याच्या व कार्यालये पेटवून दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या संघर्षात झालेल्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून ही मागणी घेऊन इराकमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनांमध्ये ६०० हून अधिक जणांचा बळी गेला होता.

दरम्यान, इराकमधील ही निदर्शने दडपण्यासाठी थेट इराणने हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराकमधील सशस्त्र गटांच्या सहाय्याने या निदर्शकांवर गोळीबार केल्याचे व्हिडियो देखील प्रसिद्ध झाले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info