Breaking News

उघुर कायद्यावरून अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील – चीनचा इशारा

Uyghur Human Rights Policy Act US, China, उघुर, अमेरिका, चीन

बीजिंग – ‘अमेरिकेने उघुरवंशीयांसाठी केलेला कायदा चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप असून ही चूक अमेरिकेने तातडीने सुधारावी. अन्यथा चीन या मुद्द्यावर खणखणीत प्रत्युत्तर देण्यास सक्षम असून अमेरिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’, इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच अमेरिकी संसदेने मंजूर केलेल्या ‘उघुर ह्युमन राईट्स ऍक्ट’वर स्वाक्षरी केली असून त्याविरोधात चीनकडून ही प्रतिक्रिया उमटली आहे.

उघुर, अमेरिका, चीन

चीनकडून गेली काही वर्षे झिंजिआंग प्रांतातील इस्लामधर्मिय उघुरवंशियांचा सातत्याने छळ सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेण्यात आली आहे. २०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात चीनने तब्बल ११ लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला होता. या अहवालानंतर पाश्‍चिमात्य देशांनी उघुरांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनमधील उघुरवंशियांच्या मुद्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून अमेरिकेने उघुरवंशियांच्या मुद्यावरून चीनविरोधात कारवाईला सुरुवात केली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने चीनमधील सरकारी अधिकारी तसेच सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य व त्यांच्या कुटुंबियांवर व्हिसाबंदी जाहीर केली होती. झिंजिआंग प्रांतातील अंतर्गत सुरक्षा विभागासह १९ सरकारी यंत्रणा व ९ खाजगी कंपन्यांना अमेरिकेने ‘ब्लॅक लिस्ट’मध्येही टाकले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेला कायदा याच कारवाईतील पुढचा टप्पा आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात ‘उघुर ह्युमन राईट्स ऍक्ट’ला ४१३ विरुद्ध १ मतांनी मंजुरी देण्यात आली होती. संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये विधेयकाला आधीच मान्यता देण्यात आली होती. उघुरवंशियांशी निगडित या कायद्यात चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद आहे. चीनचे जे अधिकारी उघुरांवरील कारवाईत सामील आहेत, त्या सर्वांना लक्ष्य करण्यात येणार आहे.उघुर, अमेरिका, चीन

या अधिकाऱ्यांची अमेरिकेतील मालमत्ता गोठविण्यात येणार असून त्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही. कायद्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे झिंजिआंग प्रांताचे प्रमुख ‘शेन क्वांगुओ’ यांचा उल्लेख आहे. शेन चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सामर्थ्यशाली ‘पॉलिटब्युरो’चे सदस्य आहेत. झिंजिआंगमध्ये उघुरांवर करण्यात आलेल्या कारवाईची सूत्रे शेन यांच्याकडे होती. त्यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

गुरुवारी चीनच्या संसदेतील सर्वाधिक प्रभावी ‘स्टँडिंग कमिटी’ची बैठक सुरू झाली आहे. तर बुधवारी चीनच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख यांग जिएची यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उघुरांवरील कायद्यावर स्वाक्षरी करून चीनला संदेश दिल्याचे दिसत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info