इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य म्हणजे युद्धाची घोषणा – लिबियन सरकारचा इशारा

इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य म्हणजे युद्धाची घोषणा – लिबियन सरकारचा इशारा

कैरो/त्रिपोली, दि.२२ – इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी लिबियातील लष्करी हस्तक्षेपा बाबत केलेले वक्तव्य ही युद्धाची घोषणा ठरते, असा इशारा लिबियन सरकारने दिला आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी, इजिप्तच्या लष्कराला लिबियातील मोहिमेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. लिबियातील ‘सिरते’ व ‘जुफ्रा’चा ताबा इजिप्तसाठी ‘रेड लाईन’ असून आपल्याला लिबियात लष्करी कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत असे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांनी बजावले. इजिप्तच्या लिबिया मोहिमेला सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीने समर्थन दिले असून युरोपीय महासंघाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

इजिप्त, युद्धाची घोषणा, लिबिया

या महिन्याच्या सुरुवातीला लिबियन लष्कराने राजधानी त्रिपोलीमधून बंडखोरांना पिटाळून लावत तरहुन शहराचाही ताबा घेतला होता. संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेल्या लिबियन सरकारला मिळालेला हा फार मोठा विजय मानला जातो. गेल्या १४ महिन्यांपासून लिबियाची राजधानी त्रिपोली ताब्यात घेण्यासाठी संघर्ष करणारे बंडखोर लष्करी नेते हफ्तार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जातो. तरहुन येथील विजय निर्णायक असल्याचा दावा करून लिबियन सरकार व समर्थक लष्कराने इतर भागावर धडक मारण्याचे इरादे व्यक्त केले होते.

मात्र लिबियाच्या पूर्व तसेच दक्षिणेकडील इंधन संपन्न भागावर अजूनही बंडखोर नेते हफ्तार यांचे नियंत्रण आहे. हफ्तार यांचा या भागावरील ताबा कायम रहावा म्हणून त्यांना समर्थन देणारे देश आता पुढे सरसावल्याचे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या इशाऱ्यावरून दिसत आहे.

‘लिबियात काहीजण लष्करी बळाचा वापर करून मोठ्या क्षेत्रावर ताबा मिळवण्याचे इरादे बोलून दाखवित आहेत. मात्र शस्त्रांच्या बळावर ते पूर्व किंवा पश्चिम कोणत्याही दिलेला सरकू शकत नाहीत हे त्यांनी चांगलेच लक्षात ठेवावे. संघर्ष थांबविण्यासाठी जो काही प्रस्ताव समोर आला होता त्याचा सर्वांनी आदर राखण्याची गरज आहे. चर्चा करून लिबियातील समस्या सोडविता येईल. लिबियातील सिरते व जुफ्रा ही इजिप्तसाठी रेड लाईन आहे. त्यापलीकडे धडकण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष अटळ आहे. यापुढे इजिप्तने लिबियात लष्करी हस्तक्षेप केल्यास त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे असे गृहीत धरले जाईल’, अशा शब्दात इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांनी लिबियावर हल्ले करण्याची धमकी दिली.

इजिप्त, युद्धाची घोषणा, लिबिया

लिबियन सीमेला जोडून असलेल्या इजिप्तमधील एका लष्करी तळाला दिलेल्या भेटीत राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांनी ही धमकी दिली. यावेळी त्यांनी इजिप्तच्या लष्कराला परदेशातील मोहिमेसाठी तयार रहावे असेही आदेश दिले. इजिप्तचे लष्कर या क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली लष्कर असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. लिबियातील इजिप्तच्या या संभाव्य कारवाईला सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीने पाठिंबा जाहीर केला आहे. इजिप्तला आपली सीमा सुरक्षित राखण्याचा पूर्ण अधिकार आहे असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. तर स्थैर्य व सुरक्षेसाठी इजिप्त जी काही कारवाई करील त्याला आपले पूर्ण समर्थन असेल, असे संयुक्त अरब अमिरातीने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले.

लिबियात संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपीय महासंघ व तुर्कीचे समर्थन असलेल्या सरकारकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांची कृती चिथावणी देणारी व थेट हस्तक्षेप करणारी आहे. लिबियात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हा त्याच्या सार्वभौमत्वावर हल्ला ठरतो. त्यामुळे इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य म्हणजे युद्धाची घोषणाच आहे’, असा इशारा लिबियन सरकारने दिला.

लिबियामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेले ‘गव्हर्मेंट ऑफ नॅशनल अकोर्ड’ सत्तेवर आहे. मात्र लिबियाचे लष्करप्रमुख जनरल हफ्तार यांनी या सरकारला आव्हान देऊन लष्करी उठाव केला होता. संयुक्त अरब अमिरात व इजिप्त या देशांचे समर्थन मिळालेल्या हफ्तार यांच्यामागे रशियानेही पाठबळ उभे केले होते. त्याच्या बळावर हफ्तार यानी लिबियन लष्कराच्या एका मोठ्या गटाला हाताशी धरून मोठ्या क्षेत्रावर ताबा मिळविण्यात यश मिळविले होते. त्यानंतर तुर्की व इतर देशांच्या मदतीने लिबियन सरकारने पुन्हा काही भाग ताब्यात घेतला होता. आता इजिप्तच्या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा लिबियात रक्तरंजित संघर्षाचा भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info