Breaking News

चीन ब्रिटनविरोधात ‘सायबर ९/११’ घडवू शकतो – ब्रिटिश मंत्री व अधिकाऱ्यांचा इशारा

Cyber 9/11, china, uk

लंडन – हॉंगकॉंग, हुवेई आणि कोरोनाच्या साथीवरून ब्रिटन व चीनमधील राजनैतिक संबंध बिघडले असून त्यावरून धडा शिकवण्यासाठी चीन, ९/११ \च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे ब्रिटनवर भयंकर सायबरहल्ले चढवेल, असा इशारा ब्रिटिश मंत्री व अधिकाऱ्यांनी दिला आहे. हॉंगकॉंग मुद्द्यावरून चीनला धारेवर धरणाऱ्या ब्रिटनने कोरोना साथीची स्वतंत्र चौकशी सुरू केल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन लवकरच चीनच्या हुवेई कंपनीवर बंदीचा निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा इशारा समोर आला असून, गेल्या महिन्याभरात चीनने त्याच्या कारवायांना प्रत्युत्तर देणाऱ्या ऑस्ट्रेलिया व भारताविरोधात मोठे सायबरहल्ले चढविल्याचे समोर आले होते.

९/११, चीन, ब्रिटन

‘अमेरिकेवर चढवण्यात आलेल्या ९/११च्या भयंकर दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच चीनदेखील ब्रिटनविरोधात भयानक सायबरहल्ला घडवू शकतो. या ‘सायबर ९/११ ‘ मुळे ब्रिटनमधील संपर्क यंत्रणा व कॉम्प्युटर नेटवर्क पूर्णपणे ठप्प होईल आणि सरकारी कामकाज, उद्योग क्षेत्र व आरोग्यव्यवस्था कोलमडून पडेल’, असा गंभीर इशारा ब्रिटिश मंत्री तसेच वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिला. ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान चीनच्या धोक्यांबाबत चर्चा झाली असता त्यात हा इशारा समोर आल्याचे सांगण्यात येते.

ब्रिटनमधील एका वरिष्ठ मंत्र्यांनी चीनकडून असलेल्या सायबरहल्ल्याच्या धोक्यावर चर्चा झाल्याची कबुली दिली आहे. ‘चीनची हुवेई कंपनी ही मोठी समस्या आहे आणि त्यावर निर्णय न घेणे ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. या निर्णयामुळे ब्रिटनला गंभीर परिणामांचा मुकाबला करावा लागू शकतो आणि त्याची शक्यता नाकारून चालणार नाही. धोका सर्वच क्षेत्रात असेल’, अशी भीती वरिष्ठ ब्रिटिश मंत्र्यांनी व्यक्त केली. ब्रिटनमधील लेबर पार्टीचे संसद सदस्य व शॅडो मिनिस्टर कॉनर मॅकगिन यांनीही सायबरहल्ल्याची शक्यता व्यक्त केली असून शत्रू देशाकडून असा हल्ला होऊ शकतो आणि सरकारने त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवायला हवी असे बजावले आहे.

ब्रिटिश संसदेच्या ‘डिफेन्स सिलेक्ट कमिटी’चे प्रमुख टोबिअस एलवूड यांनी ब्रिटनला असलेल्या चीनच्या वाढत्या धोक्याबाबत दुजोरा दिला. ‘शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाकडून भेटायलाच इतका धोका होता त्याच्या अनेक पट धोका सध्या चीनकडून आहे. रशियन संघराज्यापेक्षा सध्याचा चीन प्रचंड श्रीमंत आहे. रशियन नेते स्टॅलिन व ख्रुश्चेव्ह यांनी विचारही केला नसेल असे दीर्घकालीन धोरण चीनच्या राजवटीने आखले असून ते रशियापेक्षा जास्त कपटी आहेत. चीनच्या राजवटीने ज्या भयानक पद्धतीने कोरोना साथीचे वास्तव दडपण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांच्यावर विश्वास टाकता येणार नाही’, अशा शब्दात एलवूड यांनी चीनच्या धोक्याकडे लक्ष वेधले.

चीनचा कम्युनिस्ट राजवटीने कोरोना साथीची चुकीची हाताळणी केल्यावरून ब्रिटिश सरकारने त्यांना धारेवर धरले होते. ब्रिटनने या साथीची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून याप्रकरणी ब्रिटीश यंत्रणा अमेरिकेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी हॉंगकॉंगमध्ये सुरक्षा कायदा लादल्यानंतर ब्रिटनने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून २५ लाखांहून अधिक हॉंगकॉंगवासियांना ब्रिटिश नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन चीनच्या हुवेई कंपनीवर बंदी घालण्याची घोषणा करतील, असे सांगण्यात येते.

ब्रिटनने चीनविरोधात स्वीकारलेल्या या आक्रमक भूमिकेने चीनची राजवट बिथरली आहे. चीनचे राजदूत तसेच प्रवक्त्यांनी ब्रिटनवर वसाहतवादी व शीतयुद्धकालिन मानसिकतेचे आरोप केले असून तीव्र परिणामांची धमकी दिली आहे. गेल्या काही महिन्यात चीनच्या कारवायांना तोडीस तोड प्रत्युत्तर देणाऱ्या ऑस्ट्रेलिया तसेच भारताविरोधात चीनने मोठे सायबरहल्ले चढविले होते. या सायबरहल्ल्यांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

ब्रिटनवर मोठ्या सायबरहल्ल्यांची भीती व्यक्त होत असतानाच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी चर्चा केल्याचे समोर येत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info