अमेरिका-चीन संघर्षात साऊथ चायना सी महत्त्वाचा टप्पा ठरेल – विश्लेषकांचा दावा

अमेरिका-चीन संघर्षात साऊथ चायना सी महत्त्वाचा टप्पा ठरेल – विश्लेषकांचा दावा

बीजिंग/वॉशिंग्टन – साऊथ चायना सीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन किंवा अमेरिका कोणीही माघार घेण्याच्या स्थितीत नसून, या क्षेत्रातील पुढील घडामोडी अमेरिका-चीन संघर्षातील निर्णायक टप्पा ठरेल, असा दावा विश्लेषकांनी केला आहे. अमेरिकेने साऊथ चायना सीवरील चीनचे सर्व दावे धुडकावून आपल्या विमानवाहू युद्धनौका या क्षेत्रात तैनात केल्या आहेत. तर चीनने, अमेरिकेचे धोरण चिथावणी देणारे असून त्यामुळे या क्षेत्रात संघर्ष भडकू शकतो, असे बजावले आहे. दोन्ही देशांचे हे आक्रमक पवित्रे साऊथ चायना सीवरून निर्माण झालेला तणाव युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचल्याचे संकेत देणारे ठरतात.

अमेरिकेने गेल्या आठवड्यात साऊथ चायना सी बाबत आपली भूमिका स्पष्ट करताना चीनविरोधात उघड संघर्षाची भूमिका जाहीर केली होती. या क्षेत्रातील इतर देशांच्या ताब्यातील भाग चीनने बळकावल्याचा आरोप ठेवून, अशा देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका ठामपणे उभी राहील, असा इशारा अमेरिकेने दिला होता. अमेरिकेचे या आक्रमक भूमिकेनंतरही चीनने माघारीस नकार दिला असून उलट अमेरिकेने या भागातील तणाव वाढविल्याचा ठपका ठेवला. त्याचवेळी अमेरिकेच्या हस्तक्षेपाला प्रत्युत्तर देण्यासाठी चीन सज्ज असल्याचेही बजावले. दोन्ही देशांमधील शाब्दिक चकमकींची तीव्रता गेल्या काही महिन्यात वाढली असली तरी आता साऊथ चायना सीच्या मुद्द्यावरील तणाव त्यापलीकडे गेल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

‘साऊथ चायना सीच्या मुद्दावर चीनने माघार घ्यावी यासाठी अमेरिका सर्व पर्याय चाचपून बघत आहे. पण राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीन कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आपल्या योजनेनुसार चीन पूर्ण सामर्थ्यानिशी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. कोणताही देश आपल्या भूमिकेपासून बाजूला हटणार नाही. ही संघर्षाची स्थिती नजीकच्या काळात निवळेल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत’, या शब्दात ऑस्ट्रेलियाच्या ‘लॉवी इन्स्टिट्यूट’मधील तज्ञ रिचर्ड मॅक्ग्रेगर यांनी साऊथ चायना सीमध्ये लवकरच अमेरिका व चीन यांच्यात सशस्त्र संघर्ष घडवू शकतो, असे बजावले. सिंगापूरमधील सुरक्षाविषयक तज्ञ अलेक्झांडर नील यांनीही याला दुजोरा दिला.

‘चीनने साऊथ चायना सीमध्ये लष्करी तळ व आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. या क्षेत्रातील प्रत्येक भागात चीन आपले अस्तित्व दाखवून देत आहे. छोट्या बेटांवर सुविधा उभारून तैनाती वाढवणे, यामागे एक निश्चित उद्दिष्ट आहे. साऊथ चायना सी हा फक्त आपलाच आहे, हे दाखविण्याचा पुढचा टप्पा चीनने सुरूही केला आहे. अशा वेळी चीनने नवीन भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका त्याला आव्हान देऊ शकते’, या शब्दात अलेक्झांडर नील यांनी नव्या संघर्षाची शक्यता वर्तविली. ब्रिटनचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लॉर्ड रिकेट्स यांनीही नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, साऊथ चायना सी क्षेत्रात अमेरिका व चीनमध्ये प्रत्यक्ष संघर्ष भडकू शकतो, असा दावा केला आहे.

विश्लेषकांकडून संघर्षाचे दावे होत असतानाच साऊथ चायना सीमधील घडामोडींनाही चांगलाच वेग आला आहे. अमेरिकेने जाहीर केलेले आक्रमक धोरण व त्यापाठोपाठ झालेली दोन विमानवाहू युद्धनौकांची तैनाती लक्षात घेऊन चीननेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका युद्धनौका तैनात करीत असतानाच चीनने साऊथ चायना सी मधील वादग्रस्त लष्करी तळांवर ‘जे-११बी’ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. त्यापाठोपाठ शनिवारी साऊथ चायना सी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी ‘शियान-६’ हे ‘सायंटिफिक रिसर्च व्हेसल’ कार्यरत झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली.

दरम्यान, साऊथ चायना सीमध्ये चीनबरोबर वाद असणाऱ्या आशियाई देशांनीही आपली भूमिका अधिक आक्रमक केल्याचे संकेत दिले आहेत. आग्नेय आशियाई देशांचा प्रभावी गट असणाऱ्या ‘आसियन’ने अमेरिकेच्या साऊथ चायना सीविषयक भूमिकेला पाठिंबा देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. चीनचे बेकायदेशीर दावे धुडकावून आंतरराष्ट्रीय नियम व निर्णयाचे समर्थन करण्याचे अमेरिकेचे धोरण महत्त्वाचे ठरते, असे ‘आसियन’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी आसियन’चा सदस्य देश असणाऱ्या इंडोनेशियाने साऊथ चायना सी क्षेत्रात लवकरच नौदल सराव आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info