Breaking News

भूमध्य सागरी क्षेत्रातील अधिकारांच्या मुद्यावर ग्रीस-तुर्की तणाव चिघळला

Mediterranean Sea, Turkey, Greece

अथेन्स – ग्रीसच्या सागरी हद्दीत तुर्कीने पाठवलेले जहाज, भूमध्य सागरी क्षेत्रातील शांतता व स्थैर्याला धोका निर्माण करणारे आहे, असा खरमरीत इशारा ग्रीसने दिला आहे. तुर्कीच्या कारवाया ही नवी चिथावणी असून, आपले सार्वभौमत्व व अधिकारांच्या संरक्षणासाठी ग्रीस सज्ज आहे, असेही सरकारने बजावले. तर गेल्या आठवड्यात ग्रीस व इजिप्तदरम्यान झालेला करार निरार्थक असून तुर्कीची आठ कोटी जनता मोहिमेच्या पाठीशी आहे, असे प्रत्युत्तर तुर्कीकडून देण्यात आले आहे. ग्रीस व तुर्की हे दोन्ही नाटो सदस्य असून युरोपियन देशांनी ग्रीसला समर्थन देण्याचे संकेत दिल्याने भूमध्य सागरातील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

भूमध्य सागरी क्षेत्र

रविवारी तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी दाखल होत असल्याचे जाहीर केले. तुर्कीच्या या घोषणेवर ग्रीसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘भूमध्य सागरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचवणाऱ्या बेकायदेशीर कारवाया तुर्कीने ताबडतोब थांबवाव्यात. तुर्कीची मोहीम ही नवी गंभीर चिथावणी आहे. भूमध्य सागरी क्षेत्र अस्थिर करण्यामागील तुर्कीची भूमिका यातून उघड होत आहे. ग्रीस कोणत्याही ब्लॅकमेलला बळी पडणार नसून, आपले सार्वभौमत्व व अधिकारांच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत’, असा खणखणीत इशारा ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकोस डेंडीअस यांनी दिला.

ग्रीसच्या पंतप्रधानांनी आपल्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’सह संरक्षणदलप्रमुखांची बैठकही घेतली असून, सर्व दलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. तुर्कीची तीन जहाजे ग्रीसच्या कॅस्टेलोरीझो बेटाच्या दक्षिणेकडील सागरी क्षेत्रात असून ग्रीसच्या युद्धनौकांनी या भागात आपली गस्त सुरू केली आहे. तुर्कीनेही आपल्या युद्धनौका या क्षेत्रानजिक तैनात केल्याचे सांगण्यात येते. तुर्कीच्या या चिथावणीखोर कारवायांबाबत ग्रीस सरकारने युरोपीय महासंघ तसेच नाटोशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भूमध्य सागरी क्षेत्र

ग्रीस व तुर्कीने आंतरराष्ट्रीय कायदा तसेच नाटो आघाडीतील सदस्य देशांमध्ये असलेले सामंजस्य ध्यानात घेऊन चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, असे आवाहन नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केले आहे. युरोपीय महासंघाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या जर्मनीने तुर्कीच्या मोहिमेवर टीकास्त्र सोडले आहे. सध्याच्या काळात उत्खननाची मोहीम चुकीचा संदेश देणारी ठरते, असे जर्मनीने बजावले आहे. यावर तुर्कीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून इतर देशांनी तुर्कीसारख्या मोठ्या देशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये, अशा शब्दात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी बजावले. सध्याच्या तणावासाठी ग्रीसच जबाबदार असल्याचा आरोपही तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. इस्रायल, ग्रीस, सायप्रस व तुर्कीच्या सागरी हद्दीत हे साठे असून, त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणाऱ्या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. आपला दावा भक्कम करण्यासाठी गेल्यावर्षी तुर्कीने लिबियाबरोबर एक करारही केला होता. मात्र या करारावर आंतरराष्ट्रीय स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

भूमध्य सागरी क्षेत्र

तुर्कीच्या या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसने इस्रायल व इजिप्तसह युरोपीय महासंघाचे सहकार्य घेतले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात ग्रीसमध्ये झालेल्या एका बैठकीत इस्रायल, सायप्रस व ग्रीस या तीन देशांनी ‘ईस्टमेड इंधनवाहिनी प्रकल्पा’च्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ६.८६ अब्ज डॉलर्स खर्चाच्या या प्रकल्पाअंतर्गत इस्रायलच्या सागरी क्षेत्रातील ‘लेव्हियाथन बेसिन’पासून ग्रीसपर्यंत १,९०० किलोमीटर्स लांबीची इंधनवाहिनी उभारण्यात येणार आहे. खोल सागरी तळाशी उभारण्यात येणाऱ्या या इंधनवाहिनीच्या सर्वेक्षणाचे काम आधीच सुरू झाले असून त्यात युरोपिय कंपन्यांचा सहभाग आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यात ग्रीसने इजिप्तबरोबर भूमध्य सागरी क्षेत्रातील ‘एक्सक्लूझिव्ह इकॉनॉमिक झोन’साठी करार केला.

तुर्कीने सोमवारी ग्रीसच्या बेटानजिक धाडलेले जहाज व पुढील सागरी मोहीम या कराराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. मात्र यापूर्वी तुर्कीने युरोपसह आंतरराष्ट्रीय समुदायाचे आवाहन धुडकावून भूमध्य सागरी क्षेत्रात आपली जहाजे तसेच युद्धनौका पाठवून सागरी मोहिमा राबविल्या आहेत. यामागे या क्षेत्रातील आपल्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची धडपड असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे नजीकच्या काळात भूमध्य सागरी क्षेत्रातील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info