Breaking News

चीनच्या कारवाया रोखण्यासाठी जपान व्हिएतनामला सहा प्रगत गस्तीनौका देणार

patrol ships, China, Japan, Vietnam

टोकियो/हनोई – चीनकडून साऊथ चायना सी सागरी क्षेत्रात सुरू असणाऱ्या चिथावणीखोर कारवाया रोखण्यासाठी जपानने व्हिएतनामला सहा प्रगत गस्तीनौका देण्याचा निर्णय घेतला आहे. जपानने यापूर्वी फिलिपाईन्सच्या नौदलालाही गस्तीनौकांचा पुरवठा केला असून व्हिएतनाम हा साऊथ चायना सी सागरी क्षेत्रातला दुसरा महत्त्वाचा देश ठरला आहे. दरम्यान, साऊथ चायना सी मध्ये अमेरिकी फौजा समोर आल्यास त्यांना पहिली चिथावणी देऊ नका, असा सावधगिरीचा सल्ला चीनने आपल्या संरक्षणदलांना दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

साउथ चायना सी क्षेत्रातील स्थिती युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत येउन पोहोचल्याचा इशारा गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने देण्यात येत आहेत. अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी या क्षेत्रातील संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात व आक्रमकरित्या वाढविण्याचा हवाला त्यासाठी देण्यात येत आहे. अमेरिकेने साऊथ चायना सी क्षेत्रातील ‘आसियन’ देशांना शस्त्रसज्ज करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी मित्रदेशांचेही सहाय्य घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरियासह जपानकडून या देशांबरोबर झालेले करार याचाच भाग आहे.

व्हिएतनामच्या सागरी हद्दीत चीनच्या घुसखोरीची धोका गेला काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एप्रिल महिन्यात चीनच्या एका गस्तीनौकेने व्हिएतनामच्या बोटीला धडक देऊन बुडवल्याची घटनाही घडली होती. या पार्श्‍वभूमीवर व्हिएतनामने आपली सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी तटरक्षक दलाची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जपान व व्हिएतनाममध्ये सहा प्रगत गस्तीनौकांसाठी झालेला करार त्याचाच हिस्सा आहे. या गस्तीनौकांसाठी ४० कोटी डॉलर्स खर्च होणार असून त्यातील सुमारे ३५ कोटी डॉलर्स जपानकडून व्हिएतनामला अर्थसहाय्याच्या रूपात देण्यात येणार आहेत. २०२५ सालापर्यंत गस्तीनौका व्हिएतनामच्या तटरक्षक दलात दाखल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, गेल्या आठवड्यापर्यंत साऊथ चायना सी क्षेत्रात फिरणाऱ्या अमेरिकी युद्धनौका व लढाऊ विमानांना धमकावणाऱ्या चीनने अचानक नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. साऊथ चायना सी मध्ये अमेरिकेच्या फौजा समोर आल्यास त्यांना चिथावणी देणारी कारवाई करून नका, अशी सूचना चीनच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या संरक्षणदलांना दिली आहे. हॉंगकॉंगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामागे गेल्या आठवड्यात अमेरिका व चीनच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये फोनवरून झालेली चर्चा कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी, गेल्या आठवड्यात चीनचे संरक्षणमंत्री जनरल वी फेंगहे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यासंदर्भातील अधिकृत निवेदनही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. दूरध्वनीवर झालेल्या संभाषणात, अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी साऊथ चायना सी व तैवाननजीक चीनकडून सुरू असलेल्या कारवायांचा मुद्दा उपस्थित केला. दोन देशांमध्ये उद्भवणारी धोक्याची अथवा संभाव्य संघर्षाची स्थिती टाळण्यासाठी संवादाचे मार्ग खुले राखणे महत्त्वाचे आहे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे. या चर्चेनंतर चीनने साऊथ चायना सीमधील आपल्या संरक्षणदलांना अमेरिकेविरोधात चिथावणीखोर कारवाई टाळण्याचा सल्ला दिला, याकडे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने लक्ष वेधले आहे..

गेल्या महिन्यात अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्ये तैनात केल्या होत्या. त्यानंतरही अमेरिकेची लढाऊ विमाने, बॉम्बर्स, टेहळणी विमाने व ड्रोन्स या क्षेत्रात सातत्याने गस्त घालीत आहेत. पुढील आठवड्यात अमेरिकेचा महत्त्वाकांक्षी नौदल सराव ‘रिम ऑफ पॅसिफिक २०२०’ सुरू होणार आहे. अमेरिकेसह २५ देशांचे नौदल यात सहभागी होणार आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला चीनकडून एकापाठोपाठ युद्धसरावांचे आयोजन सुरू असून, येत्या काही दिवसात अमेरिकेच्या पॅसिफिक महासागरातील गुआम संरक्षणतळाजवळही सराव करण्यात येईल, असे संकेत चीनच्या संरक्षणदलांकडून देण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही देशांच्या फौजा एकमेकांसमोर येण्याची शक्यता असून त्यातून संघर्षाची ठिणगी उडू शकते. या पार्श्वभूमीवर, चीनने आपल्या संरक्षणदलांना दिलेली सावधगिरीची सूचना लक्ष वेधून घेणारी ठरते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info