Breaking News

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रीगन’चा साऊथ चायना सीमध्ये युद्धसराव  

वॉशिंग्टन – चीनकडून हॉंगकॉंग पाठोपाठ तैवानवर आक्रमणाच्या धमक्या दिल्या जात असतानाच, अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रीगन’ पुन्हा ‘साऊथ चायना सी’मध्ये दाखल झाली आहे. यावेळी विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रीगन’ व ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ने ‘बी-१बी लान्सर बॉम्बर’बरोबर युद्धसराव केल्याची माहिती अमेरिकी नौदलाने दिली. गेल्या तीन महिन्यात अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सी क्षेत्रात तैनात करण्याची ही चौथी वेळ आहे. या तैनातीतून अमेरिका चीनला स्पष्ट सामरिक संदेश देत असल्याचा दावा लष्करी अधिकारी तसेच विश्लेषक करीत आहेत.

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौकाशुक्रवारी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रीगन’ आपल्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’सह साऊथ चायना सी क्षेत्रात दाखल झाली. ‘आपल्या भागीदार देशांबरोबर एकत्रितरित्या संयुक्त दल म्हणून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी इंडो पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले ठेवणे आमची जबाबदारी आहे. साऊथ चायना सी मधील अमेरिकेचा मोहिमा आपल्या सहकारी व भागीदार देशांना दिलेल्या वचनबद्धतेचा भाग आहेत’, या शब्दात अमेरिकन नौदलाचे  वरिष्ठ अधिकारी कमांडर जोशुआ फॅगन यांनी विमानवाहू युद्धनौकेच्या मोहिमेची माहिती दिली.

गेल्या काही महिन्यात चीनकडून साऊथ चायना सी क्षेत्रात जोरदार कारवाया सुरू आहेत. शेजारील देशांच्या नौका बुडविणे, सागरी हद्दीत घुसखोरी करणे व लष्करी सामर्थ्याच्या बळावर धमकावणे यासारखे उद्योग सातत्याने सुरू आहेत. त्यात हॉंगकॉंगवर ताबा मिळवण्यासाठी आणलेला कायदा आणि तैवानवरील आक्रमणाच्या धमक्या यांचीही भर पडली आहे. गेले काही दिवस चीन तैवाननजीकच्या क्षेत्रात आपल्या लष्करी सामर्थ्याचे सातत्याने प्रदर्शन करीत आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेने साऊथ चायना सीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना चीनविरोधात उघड संघर्षाची भूमिका जाहीर केली होती. या क्षेत्रातील इतर देशांच्या ताब्यातील भाग चीनने बळकावल्याचा आरोप ठेवून, अशा देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका ठामपणे उभी राहील, असा इशारा अमेरिकेने दिला होता. विमानवाहू युद्धनौका व ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’च्या रूपात अमेरिकेची या क्षेत्रातील व्यापक तैनाती त्याचाच भाग ठरतो.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info