अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिकेला अल कायदापासून असलेला धोका वाढेल – सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी

अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिकेला अल कायदापासून असलेला धोका वाढेल – सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी

काबुल – ‘अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले वाढत चालले आहेत. अमेरिका आणि नाटोच्या लष्कराची माघार पूर्ण झाल्यानंतर, इथे दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढेल. अल कायदाचे नेटवर्क अफगाणिस्तानात अधिक प्रबळ होईल आणि या दहशतवादी संघटनेपासून अमेरिकेच्या सुरक्षेला असलेला धोका अधिकच वाढेल’, असा इशारा अमेरिकेच्या सेंट्रल कमांड-सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी दिला. अमेरिकी संरक्षण विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने देखील बायडेन प्रशासनाला अफगाणिस्तानातील अल कायदाबाबत सावध केले. कितीही नाकारले तरी तालिबानचे अल कायदाबरोबरचे सहकार्य कायम असून या दोन्ही संघटना लवकरच अफगाणिस्तानात भीषण हल्ले घडवतील, असे अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने बजावले आहे.

फ्रँक मॅकेन्झी

अमेरिका आणि नाटोने अफगाणिस्तानातून आपले सैन्य माघारी घेण्याचा वेग वाढविल्याच्या बातम्या आहेत. पण सैन्यमाघार घेतली तरी अमेरिका अफगाणिस्तानकडे पाठ फिरवणार नसल्याचे अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी सोमवारी स्पष्ट केले. सेंटकॉमच्या अखत्यारित येणार्‍या आखाती देशांमधील लष्करी तळांवर अमेरिकी लष्कराची मोठी तैनाती असल्याचे किरबाय म्हणाले. सैन्यमाघार घेतली तरी अमेरिका आखातातील आपल्या सैन्यतैनातीचा वापर अफगाणिस्तानातील कारवाईसाठी करू शकतो, असे किरबाय यांना सुचवायचे आहे.

पण अफगाणिस्तानातील संपूर्ण माघारीनंतर या देशातील दहशतवाद्यांच्या कारवायांवर नजर ठेवणे आणि त्यांच्यावर हल्ले चढविणे, अमेरिकेसाठी अवघड बनेल, असा इशारा सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी अमेरिकी वृत्तवाहिनशी बोलताना दिला. आखातातील लष्करी तळावर तैनात विमाने अफगाणिस्तानात पोहोचेपर्यंत चार ते सहा तास लागू शकतात, याची आठवण जनरल मॅकेन्झी यांनी करून दिली.

फ्रँक मॅकेन्झी

‘‘गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या कारवाईमुळे अल कायदा आणि ‘आयएस-खोरासन’ या दोन्ही दहशतवादी संघटनांची जबरदस्त हानी झाली आहे. पण अमेरिकेच्या माघारीनंतर अल कायदाचे दहशतवादी अफगाणिस्तानात निर्माण होणार्‍या पोकळीचा फायदा घेऊन आपले तळ पुन्हा उभारतील. हे अगदी पुढच्याच महिन्यात किंवा येत्या सहा महिन्यांमध्ये होईल, असे सांगता येणार नाही. पण येत्या काळात अल कायदा अफगाणिस्तानात पुन्हा मजबूत होईल व तसे झाले तर ते अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अधिक धोकादायक ठरेल’’, असे मॅकेन्झी यांनी बजावले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकी संरक्षण विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने (डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी-डिआयए) देखील तालिबान आणि अल कायदा या दोन्ही संघटनांमध्ये अजूनही साटेलोटे असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेतल्यावर या दोन्ही दहशतवादी संघटना पहिल्यासारख्या अफगाणी जनता आणि सुरक्षादलांवर हल्ले चढवतील, असे डिआयएने म्हटले होते.

दरम्यान, अफगाणिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘एनडीएस’चे प्रमुख अहमद झिया सराज देखील तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांकडे जगाचे लक्ष वेधत आहेत. गेल्या पाच महिन्यांहून कमी कालावधीत तालिबानने अफगाणिस्तानात 3,500 हल्ले चढविले आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये या हल्ल्यांची तीव्रता वाढली असून बघलान, हेल्मंड, कंदाहर, कुंदूझ आणि लघमान प्रांतात तालिबानचे हल्ले तीव्र झाल्याची माहिती सराज यांनी दिली आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info