Breaking News

चीनकडून ‘अँटी सॅटेलाइट वेपन्स’च्या साठ्यात भर – अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा अहवाल

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या लष्कराने अंतराळातील उपग्रहांना भेदू शकणारी शस्त्रे व तंत्रज्ञान विकसित करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे. त्यात ‘कायनेटिक किल मिसाईल्स’, ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन्स’, ‘ग्राउंड बेस्ड लेझर्स’, ‘स्पेस रोबोटस्’ व ‘सॅटेलाईट जॅमर्स’चा समावेश आहे. चीनने यापूर्वी २००७ सालीच आपल्याकडे अंतराळातील उपग्रह भेदणारे क्षेपणास्त्र असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतरच्या काळात चीनने विकसित केलेली ‘स्पेस वेपन्स’ या देशाने अंतराळातील युद्धासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत देणारी ठरतात.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नुकताच ‘मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना २०२०’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. अमेरिकी संसदेला सादर केलेल्या या अहवालात, चीनने संरक्षणक्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी सुरू केलेल्या हालचालींकडे लक्ष वेधले आहे. त्यात आण्विक तसेच अंतराळ क्षेत्रातील चीनच्या महत्त्वाकांक्षांबाबत इशारेही देण्यात आले आहेत. ‘चीनने पृथ्वीनजीक असणाऱ्या कक्षेतील उपग्रहांना जमिनीवरून भेदणारी क्षेपणास्त्र यंत्रणा आधीच कार्यरत केली आहे. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष पृथ्वीच्या सर्वात वरच्या कक्षेत असणाऱ्या उपग्रहांना नष्ट करणारी शस्त्रे व यंत्रणा यांच्यावर दिले असून त्यात अधिकाधिक भर टाकण्यासाठी हालचाली सुरू ठेवल्या आहेत’, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बजावले.

शत्रूच्या अंतराळातील क्षमता निकामी करून त्याला आंधळे व बहिरे करणे हे चीनने विकसित केलेल्या ‘स्पेस वेपन्स’चे मुख्य उद्दिष्ट असल्याची जाणीव, अहवालातून करून देण्यात आली आहे. ‘आधुनिक काळातील युद्धासाठी अंतराळ क्षेत्रातील आपल्या क्षमतांचा प्रभावी वापर करणे आणि त्याचवेळी शत्रूला ती संधी नाकारणे, यावर चीनच्या लष्करी तज्ञांनी भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतराळ क्षेत्राच्या लष्करीकरणाला विरोध दर्शविणाऱ्या चीनने प्रत्यक्षात आपल्या संरक्षणदलांची अंतराळातील क्षमता वाढविण्यासाठी आक्रमक पावले उचलली’, या शब्दात अमेरिकेने चीनवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.

२००७ साली अंतराळातील उपग्रह भेदणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर चीनने आपल्या ‘स्पेस वेपन्स’ बाबत कोणतीही माहिती उघड केलेली नाही. मात्र अमेरिकी संरक्षण विभागाच्या अहवालात चीनने विकसित केलेली स्पेस वेपन्स तसेच तंत्रज्ञानाचा विस्ताराने उल्लेख करण्यात आला आहे. अंतराळात फिरणारे उपग्रह व इतर घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने ‘स्पेस सर्व्हिलन्स सिस्टीम’सह अवकाशात वापरता येईल असे सायबर तंत्रज्ञानही विकसित केले आहे. चीनकडे असलेल्या ‘स्पेस वेपन्स’मध्ये ‘कायनेटिक किल मिसाईल्स’, ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन्स’, ‘ग्राउंड बेस्ड लेझर्स’, ‘स्पेस रोबोटस्’ व ‘सॅटेलाईट जॅमर्स’चा असल्याचे अमेरिकेच्या अहवालात सांगण्यात आले.

अमेरिकेकडून चीनच्या अंतराळ क्षेत्रातील हालचालींकडे लक्ष वेधले जात असतानाच ब्रिटननेही या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. चीनने अंतराळ क्षेत्राचा वापर लष्करी आक्रमकतेसाठी केला असून, यामुळे सर्वच देशांच्या अंतराळातील हितसंबंधाची सुरक्षा संकटात सापडल्याचा इशारा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info