तैवानची ‘क्रूझ मिसाईल्स’ चीनच्या तळांना लक्ष्य करण्यास सज्ज

तैवानची ‘क्रूझ मिसाईल्स’ चीनच्या तळांना लक्ष्य करण्यास सज्ज

तैपेई – चीनकडून तैवानवर ताबा मिळविण्याची रंगीत तालीम सुरू असल्याच्या धमक्या दिल्या जात असतानाच, तैवाननेही प्रतिहल्ल्यासाठी जोरदार तयारी केल्याचे समोर येत आहे. तैवानच्या संरक्षण विभागाने चीनच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची क्षमता असणारी स्वदेशी बनावटीची ‘वॅन चिएन’ ही हवेतून जमिनीवर मारा करणारी ‘क्रूझ मिसाईल्स’ विकसित केली आहेत. २०० किलोमीटर्सहून अधिक पल्ला असलेली ही क्षेपणास्त्रे चीनच्या फुजीआन व ग्वांगडॉंग प्रांतातील लष्करी तळांना लक्ष्य करू शकतात, असा दावा तैवानी माध्यमांनी केला आहे. ही क्षेपणास्त्रे तैवानने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांवर तैनात करण्यात आली आहेत. चीनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडीचा संरक्षणतळ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘माकुंग बेस’वर ‘वॅन चिएन मिसाईल्स’ तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'क्रूझ मिसाईल्स'

गेल्या काही महिन्यात तैवानच्या मुद्यावरून अमेरिका व चीनमध्ये युद्ध भडकेल, असे इशारे विविध अभ्यासगट तसेच विश्लेषकांकडून दिले जात आहेत. चीनकडून तैवानविरोधातील हालचालीही जास्तच वाढल्याचे दिसून येत असून, चीनमध्ये झालेल्या बैठकीत कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी तैवानवर हल्ला चढवण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याची आग्रही भूमिका मांडली होती. काही दिवसांपूर्वी चीनच्या संरक्षणदलांनी तैवानच्या आखातात मोठ्या लष्करी सरावाचे आयोजन केले होते. सार्वभौमत्वाची सुरक्षा व चिथावण्यांविरोधातील सज्जता या उद्देशाने सराव आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती चीनच्या प्रवक्त्यांनी दिली होती.

'क्रूझ मिसाईल्स'

या महिन्यात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून तैवानच्या हद्दीनजीक आयोजित करण्यात आलेला हा चौथा सराव मानला जातो. हे सराव म्हणजे तैवानवर आक्रमण करण्याची रंगीत तालीम असल्याचे दावेही चीनच्या प्रसारमाध्यमांनी केले आहेत. तैवानकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून चीन आपल्यावर हल्ल्याची तयारी करीत असल्याची चिंता तैवानी मंत्री व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तैवानला एकामागोमाग दिलेल्या भेटींनी चीन बिथरला असून, चीनच्या संरक्षणदलाकडून तैवानमध्ये घुसखोरीचे तसेच टेहळणीचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तैवाननेही आक्रमक पवित्रा स्वीकारला असून युद्धसज्जतेसाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने हल्ला केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानच्या सामुद्रधुनीत उभारलेल्या तळांवर मोठ्या प्रमाणावर संरक्षण तैनाती सुरू केली आहे. स्वदेशी बनावटीची लढाऊ विमाने व ‘वॅन चिएन’सारखी चिनी तळ तसेच युद्धनौकांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांची तैनाती त्याचाच भाग ठरतो. ‘वॅन चिएन’ या शब्दाचा अर्थ ‘टेन थाऊजंड स्वोर्ड्स’ असा असून या क्षेपणास्त्रांकडे चीनच्या ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ला चकवा देण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येते.

'क्रूझ मिसाईल्स'

दोन दिवसांपूर्वी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई इंग-वेन’ यांनी ‘एफ-१६’ लढाऊ विमानांनी सज्ज असलेल्या माकुंग हवाईतळाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी तैवान सज्ज असल्याचा इशाराही दिला होता. याच तळावर ‘वॅन चिएन’ क्षेपणास्त्रांसह सज्ज असलेली स्वदेशी लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. तैवानी राष्ट्राध्यक्षांच्या या भेटीनंतर, यापुढे चीनच्या युद्धनौका व विमानांनी घुसखोरीचा प्रयत्न केलाच तर तैवान आपला स्वसंरक्षणाचा अधिकार वापरताना कचरणार नाही, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने बजावले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info