Breaking News

इराणबरोबर युद्ध पुकारण्याची कुवतच अमेरिकेकडे नाही – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसचे प्रमुख

तेहरान – ‘अमेरिकेची शस्त्रास्त्रे कालबाह्य झाली आहेत. त्याचबरोबर अमेरिकेची ढासळलेली अर्थव्यवस्था प्रदीर्घ संघर्षाला सहाय्यक ठरू शकत नाही. म्हणूनच अमेरिकडे इराणविरोधात युद्ध पुकारण्याची कुवत नाही’, असा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी केला. होर्मुझच्या आखातातून प्रवास करणार्‍या अमेरिकेच्या ‘युएसएस निमित्झ’ या अजस्त्र विमानवाहू युद्धनौकेवरुन इराणच्या ड्रोनने नुकतीच टेहळणी केली. त्यानंतर रिव्होल्युशनरी गार्डसच्या प्रमुखांनी अमेरिकेला ही चिथावणी दिली. दरम्यान, पर्शियन आखातातील टेहळणीसाठी इराणने आपल्या गस्तीनौकांवर तब्बल १८८ ड्रोन्स तैनात केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पर्शियन आखाताच्या तोंडावर तैनात असलेल्या अमेरिकेच्या ‘युएसएस निमित्झ’ या महाकाय विमानवाहू युद्धनौकेने १८ सप्टेंबर रोजी आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह होर्मुझच्या आखातातून प्रवास केला. यावेळी आपल्या ड्रोनने अमेरिकेच्या युद्धनौकांवरुन टेहळणी केल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केला. या टेहळणीत अमेरिकन युद्धनौकेवरील लढाऊ विमाने तैनात असल्याचे आपल्या ड्रोनने टिपल्याचेही रिव्होल्युशनरी गार्ड्सनी जाहीर केले. इराणच्या वृत्तवाहिनीने याचे फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध केले. पण अमेरिकेच्या नौदलाने इराणचे हे वृत्त फेटाळले. होर्मुझच्या आखातातून अमेरिकी युद्धनौकांचा प्रवास सुरक्षित पार पडल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे. गेल्या वर्षी देखील इराणने अमेरिकेच्या ‘युएसएस ड्विट आयसेनहावर’ या युद्धनौकेवरुन केलेल्या टेहळणीचे फोटो प्रसिद्ध केले होते.

होर्मुझच्या आखातातील या टेहळणीला काही तास उलटत नाही तोच रिव्होल्युशनरी गार्डसच्या प्रमुखांनी अमेरिकेला चिथावणी दिली. अमेरिकेला कोरोनाव्हायरसच्या महामारीवर नियंत्रण ठेवणे देखील जमू शकलेले नाही, अशी खिल्ली रिव्होल्युशनरी गार्डसच्या प्रमुखांनी उडविली. त्याचबरोबर कालबाह्य ठरलेल्या शस्त्रास्त्रांबरोबर अमेरिकडे इराणशी युद्ध पुकारण्याची कुवत नसल्याचा दावा मेजर जनरल सलामी यांनी केला. याउलट ८०च्या दशकात लढल्या गेलेल्या इराकबरोबरच्या युद्धानंतर इराणने आपल्या संरक्षणसज्जता वाढवित नेल्याचे सलामी म्हणाले. तर अमेरिका आणि मित्रदेशांचा सामना करण्यासाठी इराणचे हजारो रेजिमेंट्स (हजार ते दोन हजार सैनिकांची एक रेजिमेंट) आखातात तैनात असल्याचे लक्षवेधी विधान मेजर जनरल सलामी यांनी केले. इराक, सिरियासह लेबेनॉन, येमेनमध्ये इराणसंलग्न गटांच्या तैनातीकडे रिव्होल्युशनरी गार्डसच्या प्रमुखांनी लक्ष वेधले.

रिव्होल्युशनरी गार्डसच्या प्रमुखांनी दिलेल्या या इशार्‍याबरोबर इराणने १८८ ड्रोन्स होर्मुझच्या आखातातील गस्तीसाठी तैनात असल्याची घोषणा केली. पर्शियन आखात, होर्मुझचे आखातात गस्त घालणर्‍या गस्तीनौकांवर हे ड्रोन्स तैनात केल्याची माहिती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने दिली. त्याचबरोबर इराणने होर्मुझच्या आखातात ’सिरिक’ येथे नवा नौदल तळ कार्यान्वित केल्याची माहिती इराणी माध्यांनी प्रसिद्ध केली आहे. या सागरी क्षेत्रातून जगभरात ३५ टक्क्यांहून अधिक इंधनाची वाहतूक केली जाते. अशा परिस्थितीत, होर्मुझच्या आखातातील इराणच्या लष्करी हालचाली या क्षेत्रातील तणाव वाढविणार्‍या ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हजार पट तीव्र उत्तर दिले जाईल, असे बजावले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info