Breaking News

अमेरिका इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार – अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’चे प्रमुख जनरल मॅकेन्झी

वॉशिंग्टन/जेरुसलेम – ‘इराणने हल्ला केलाच तर अमेरिका आपल्या, मित्र व सहकारी देशांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे’, अशी घोषणा अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’चे (सेंटकॉम) प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी केली. कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण अमेरिकी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हत्या घडविण्याची धमकी देत आहे. यावर अमेरिकेच्या सेंटकॉमच्या प्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणदल प्रमुख जनरल मार्क मिले यांनी इस्रायल तसेच सौदी अरेबिया, युएई या देशांचा गोपनीय दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. जनरल मिले यांचा हा दौरा इराणला इशारा ठरत असल्याची चर्चा आहे.

prepared to react prepared to react

या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराकमध्ये चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी ठार झाले होते. सुलेमानी यांच्या हत्येने पेटलेल्या इराणने आखातात तैनात असलेल्या अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची हत्या व अमेरिकेच्या मित्रदेशांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. सुलेमानी यांच्या हत्येला पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने इराण अमेरिकी अधिकारी व जवानांवर हल्ले चढवू शकतो, असा दावा केला जातो. यावर बोलताना ‘सेंटकॉम’चे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी अमेरिका इराणच्या अशा हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

इराण किंवा आखातातील इराणसंलग्न गटांच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी अमेरिका सज्ज असल्याचे जनरल मॅकेन्झी म्हणाले. त्याचबरोबर इराणच्या या धमकीची पर्वा न करता आपण इराक आणि सिरियाला भेट दिल्याची माहितीही सेंटकॉमच्या प्रमुखांनी दिली. इराकमधील भेटीत दहशतवादविरोधी कारवाईवर चर्चा केल्याचे मॅकेन्झी यांनी म्हणाले. जनरल मॅकेन्झी इराणच्या धमकीवर प्रतिक्रिया देत असताना, इस्रायली माध्यमांनी अमेरिकेच्या संरक्षणदल प्रमुखांच्या गोपनीय भेटीची माहिती उघड केली.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे संरक्षणदल प्रमुख जनरल मिले यांनी कतार, सौदी अरेबिया, युएई, अफगाणिस्तान आणि इस्रायलचा दौरा केला होता. इस्रायलच्या दौर्‍यात जनरल मिले यांनी इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ आणि संरक्षणदल प्रमुख अविव कोशावी यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने हिंदी महासागरात ‘युएसएस निमित्झ’ तैनात केली असून ‘बी-५२’ बॉम्बर्स विमाने आखातात तैनात केली आहेत. अशा परिस्थितीत, संरक्षणदलप्रमुख जनरल मिले यांचा इराणविरोधक सौदी, युएई व इस्रायल या देशांचा दौरा आणि जनरल मॅकेन्झी यांनी केलेली घोषणा इराणसाठी इशारा ठरत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info