इराणने इस्रायलवरील हल्ल्याचा आराखडा तयार केला आहे – इराणच्या संरक्षणमंत्र्यांची इस्रायलला धमकी

इराणने इस्रायलवरील हल्ल्याचा आराखडा तयार केला आहे – इराणच्या संरक्षणमंत्र्यांची इस्रायलला धमकी

तेहरान – ‘इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या आदेशानुसार इस्रायलवर हल्ल्याचा आराखडा तयार झाला आहे. त्यांच्या एका इशार्‍यावर इस्रायलवरील हल्ला वास्तवात उतरविला जाईल. तेव्हा इस्रायलने इराणवर हल्ले चढविण्याचे शाब्दिक इशारे देखील देऊ नये. अन्यथा इस्रायलची तेल अविव आणि हैफा ही दोन्ही शहरे जमिनदोस्त केली जातील’, अशी धमकी इराणचे संरक्षणमंत्री आमिर हतामी यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणवरील हल्ल्याचा प्लॅन अपडेट करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यावर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी ही धमकी दिली आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल सज्ज असल्याचे म्हटले होते. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी अमेरिका आणि युरोपिय देशांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा गांत्झ यांनी व्यक्त केली होती. ‘असे झाले तर इराणवर हल्ल्याची आवश्यकता भासणार नाही. पण अमेरिका व युरोपिय देशच इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणार नसतील, तर इस्रायलला स्वसंरक्षणासाठी स्वतंत्रपणे इराणवर कारवाई करावी लागेल’, असा इशारा गांत्झ यांनी दिला होता.

त्याचबरोबर इराणवरील अणुप्रकल्पाशी संबंधित ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा ‘प्लॅन’ इस्रायल ‘अपडेट’ करीत असल्याचे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. इराणमधील अशा ठिकाणांची यादीच इस्रायलने तयार केल्याचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी या मुलाखतीत सांगितले होते. साधारण महिन्याभरापूर्वी इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी देखील इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्याची तयारी झाल्याचे म्हटले होते. इस्रायली संरक्षणमंत्र्यांच्या या धमकीवर इराणचे संरक्षणमंत्री हातामी यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. ‘इस्रायलचे नेते नैराश्येच्या भरात इराणला धमकावण्याचे मोठे दावे करतात. पण आपण जर असे केले तर हैफा आणि तेल अविव जमिनदोस्त होतील, हे इस्रायलला नक्की ठाऊक आहे आणि समजा इस्रायलला हे माहित नसेल तर त्यांनी यापुढे ही गोष्ट कायमस्वरूपी ध्यानात ठेवावी’, अशी धमकी हतामी यांनी दिली. ‘इस्रायलवरील हल्ल्याचा आराखडा तयार झाला आहे.

‘इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या आदेशांनुसार लष्कराने इस्रायलच्या शहरांवर हल्ले चढविण्याचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची सज्जताही ठेवली आहे. फक्त खामेनी यांच्या इशार्‍याची प्रतिक्षा आहे’, असे हतामी यांनी रविवारच्या एका कार्यक्रमात जाहीर केले. त्याचबरोबर आपल्या सशस्त्र गटांद्वारे आखातात स्थैर्य निर्माण करण्याची क्षमता इराणकडे असल्याचा दावा संरक्षणमंत्री हतामी यांनी केला.

गेल्या चोवीस तासात इराणने इस्रायलला दिलेली ही दुसरी धमकी ठरते. काही तासांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदुत माजिद तख्त रवांची यांनी देखील इस्रायलला इशारा दिला होता. ‘इस्रायलने व्यापारी जहाजावरील हल्ल्याचा बनाव करून इराणवर हल्ल्याचा प्रयत्न केलाच तर त्यासाठी इस्रायलला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’, अशी धमकी रवांची यांनी दिली. गेल्या महिन्यात २५ फेब्रुवारी रोजी ओमानच्या आखातात इस्रायली व्यापारी जहाजात झालेल्या संशयास्पद स्फोटासाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info