इराणबरोबर अणुकरार करण्याआधी अमेरिका इस्रायल व अरब देशांशी चर्चा करील – अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन

इराणबरोबर अणुकरार करण्याआधी अमेरिका इस्रायल व अरब देशांशी चर्चा करील – अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन

वॉशिंग्टन – ‘इराण अमेरिकेच्या मागण्या मान्य करणार असेल तर अमेरिका देखील इराणबरोबर अणुकरार करण्यास तयार आहे. पण त्याआधी अमेरिका याविषयी इस्रायल व अरब मित्रदेशांशी चर्चा करील’, अशी घोषणा अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केली. त्याचबरोबर इस्रायलची सुरक्षा ही अमेरिकेसाठी आत्यंतिक आदराची बाब ठरते, असेही ब्लिंकन यांनी अमेरिकन सिनेटच्या ‘फॉरेन रिलेशन्स कमिटी’समोर स्पष्ट केले.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणार्‍या इराण अणुकराराकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याची घोषणा बायडेन यांनी याआधी केली होती. पण गेल्या दहा दिवसांमध्ये इराणने आपल्या अणुप्रकल्पातील हालचाली तीव्र केल्यानंतर, बायडेन यांनी यावर बोलण्याचे टाळले होते. पण बायडेन यांनी परराष्ट्र मंत्रीपदासाठी नियुक्त केलेले अँथनी ब्लिंकन यांनी मंगळवारी अमेरिकन सिनेटच्या ‘फॉरेन रिलेशन्स कमिटी’समोर बोलताना इराणबाबतची बायडेन प्रशासनाची भूमिका जाहीर केली.

बायडेन प्रशासनासह अणुकरार करण्यासाठी उत्सुक असलेल्या इराणने याआधी अमेरिकेच्या मागण्या मान्य कराव्या. अमेरिकेच्या अटींवर इराण अणुकरार करणार असेल तरच यापुढची पावले उचलता येतील, असे ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, ‘हा अणुकरार करण्यासाठी अमेरिकेला इस्रायल व अरब मित्रदेशांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच इराणबरोबर अणुकरार केला जाईल’, असे ब्लिंकन म्हणाले. या करारात आखातात अस्थैर्य निर्माण करणार्‍या इराणच्या कारवाया आणि क्षेपणास्त्रांचाही उल्लेख असेल, याची आठवण ब्लिंकन यांनी करुन दिली.

तर बायडेन यांचे प्रशासन इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचा दावा ब्लिंकन यांनी केला. या व्यतिरिक्त इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्यावरही अमेरिकेच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. इस्रायल, युएई आणि बाहरिन या देशांमध्ये झालेल्या अब्राहम कराराचे ब्लिंकन यांनी स्वागत केले. सदर करार इस्रायलला अधिक सुरक्षित करणार असल्याचा विश्‍वास ब्लिंकन यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर यापुढेही इस्रायलच्या जेरूसलेममध्ये अमेरिकेचा दूतावास कायम असेल, असे ब्लिंकन म्हणाले.

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे जुलमी राष्ट्राध्यक्ष होते, असा ठपका ठेवला. तर बायडेन हे अमेरिकेचे योग्य राष्ट्राध्यक्ष असून त्यांच्याकडून इराणला फार मोठ्या अपेक्षा असल्याचे रोहानी म्हणाले. तसेच २०१५ साली ओबामा प्रशासनाने केलेल्या अणुकराराची बायडेन यांनी पुनरावृत्ती करावी, असे आवाहन इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केले. इराणने अणुकराराबाबतची आपली जबाबदारी पार पाडली असून यापुढचा निर्णय बायडेन प्रशासनाला घ्यायचा आहे, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी अमेरिका अणुकराराशी बांधिल असल्याचे ठणकावले.

दरम्यान, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबाबत कुठलाही निर्णय घेण्याआधी आम्हाला विश्‍वासात घ्यावे, अशी मागणी इस्रायल आणि सौदी अरेबियाने केली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info