चीनने धोरण बदलले नाही तर आर्थिक स्तरावरील संबंध पूर्णपणे तोडून टाकू – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

चीनने धोरण बदलले नाही तर आर्थिक स्तरावरील संबंध पूर्णपणे तोडून टाकू – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन – चीनने अमेरिकी अर्थव्यवस्थेची सर्वाधिक लूट केल्याचा आरोप करून, यापुढे चीनने अमेरिकेबाबतचे धोरण बदलले नाही तर अमेरिका चीनबरोबरील आर्थिक स्तरावरील संबंध पूर्णपणे तोडून टाकेल, असा घणाघाती इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. काही काळापूर्वी अमेरिका व चीनमध्ये झालेल्या व्यापारी कराराला आता आपल्या दृष्टीने काहीही अर्थ उरला नसल्याचेही राष्ट्राध्यक्ष यांनी ट्रम्प स्पष्ट केले. त्याचवेळी आपले प्रतिस्पर्धी बिडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास अमेरिकेचे मालकी चीनकडे जाऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.

आर्थिक स्तरावरील संबंध

यापूर्वी २०१६ साली अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा उल्लेख लुटारू व दरोडेखोर देश असा केला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी चीनविरोधात दिलेली व्यापारयुद्धाची धमकी, राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर खरी करुन दाखविली होती. त्यामुळेच आता चीनबरोबरील आर्थिक संबंध पूर्णपणे तोडून टाकण्याबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधातील संघर्षाची धार अधिकच तीव्र केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह वरिष्ठ नेते व अधिकारी सातत्याने चीनला लक्ष्य करीत आहेत. अमेरिकेची संसद तसेच महत्त्वाच्या विभागांनी चीनच्या सत्ताधारी राजवटीला धक्का देणारे अनेक निर्णय घेतले आहेत. चीनविरोधातल्या मोहिमेत अमेरिकेने आपल्या अनेक मित्रदेशांनाही सहभागी करून घेतले आहे. साऊथ चायना सी, हॉंगकॉंग, उघुरवंशीय यासारख्या अनेक मुद्द्यांवरून चीनची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या मुद्द्यावरून चीनला धारेवर धरताना ट्रम्प यांनी दोनदा चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडण्याबाबत धमकावले होते. त्याबाबत पुनरुच्चार करुन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी या मुद्द्यावरून आपण माघार घेतली नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.

आर्थिक स्तरावरील संबंध

‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी, चीनवर घणाघाती प्रहार केले. ‘मला आक्रमक वक्तव्ये करून जगात आता आग लावायची नाही. अमेरिकी अर्थव्यवस्थेला चीनइतके इतर कोणत्याच देशाने लुटलेले नाही. चीनबरोबरील व्यापारात अमेरिकेला दरवर्षी शेकडो अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होते. त्याबदल्यात अमेरिकेला चीनकडून काहीही मिळत नाही. चीनमध्ये तयार झालेली काही उत्पादने अमेरिकेत येतात, पण ही उत्पादने अमेरिका स्वतःदेखील तयार करू शकते. चीनबरोबरील व्यापारात अमेरिका फक्त पैसा गमावते आहे’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले.

‘काही काळापूर्वी अमेरिकेने चीनबरोबर व्यापारी करार केला होता. चीनने अमेरिकेतून अब्जावधी डॉलर्सची आयातही सुरू केली होती. मात्र कोरोनाच्या साथीमुळे त्यानंतरची सर्व परिस्थिती बिघडली. आता चीनबरोबर झालेल्या व्यापारी कराराला माझ्या दृष्टीने अर्थ राहिलेला नाही. जर यापुढे चीनने अमेरिकेबरोबरील आपले धोरण बदलले नाही तर मी अमेरिकेचे चीनबरोबरील आर्थिक संबंध पूर्णपणे तोडून टाकण्याचा निर्णय घेईन’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. यावेळी ट्रम्प यांनी, चीनने नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, आपले प्रतिस्पर्धी उमेदवार जो बिडेन जिंकावेत यासाठी योजना आखल्याचाही दावा केला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info