लंडन – परदेशात तैनात असलेल्या ब्रिटीश सैनिकांना जैविक तसेच रासायनिक हल्ल्याला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सैनिकांना खास लस देण्यात येईल, अशी माहिती ब्रिटनचे संरक्षणमंत्री गेविन विल्यमसन यांनी दिली. यात ‘अँथ्रॅक्स’ या जैविक युद्धात वापरण्यात येणार्या घातक जीवाणूविरोधात वापरण्यात येणार्या लसीचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे संरक्षणमंत्री विल्यमसन म्हणाले.
परदेशात तैनात करण्यात येणार्या ब्रिटीश सैनिकांना रासायनिक तसेच जैविक युद्धाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वाढल्याचा इशारा ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला. त्यामुळे अशा जवानांना ‘अँथ्रॅक्स’विरोधात वापरण्यात येणारी लस देण्यात येणार असून त्यामुळे जैविक तसेच रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या हल्ल्यांपासून त्यांचा बचाव होऊ शकेल, असा दावा संरक्षणमंत्री विल्यमसन यांनी केला.
‘ब्रिटन इतिहासातील निर्णायक वळणावर उभा असून एक देश म्हणून महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. स्वस्थपणे बसून होणार्या घटनाक्रमाचे परिणाम सहन करायचे की ठोस निर्णय घेऊन पुढे जायचे याचा निर्णय घ्यावा लागेल. ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरु असतानाच सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे लागले आहे. सहकार्यांपेक्षा आपले शत्रू याकडे अधिक बारकाईने पहात आहेत’, अशा शब्दात ब्रिटनचे विरोधक सध्याच्या स्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा संरक्षणमंत्र्यांनी दिला.
सॅलिस्बरीमध्ये झालेल्या घटनेतून रशियाचा ब्रिटीश जनतेला असलेला धोक ठळकपणे समोर आल्याचा दावाही संरक्षणमंत्री विल्यमसन यांनी केला. या पार्श्वभूमीवर संरक्षणक्षेत्रासाठी अधिक निधीची तरतूद आवश्यक असून रशियाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनची क्षमता आहे की नाही याचा आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नाटोने रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या युद्धसरावात आपल्या दोन प्रगत विनाशिका धाडण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. या विनाशिका इटलीत होणार्या सरावासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)