इस्रायलच्या पंतप्रधानांना संसदेकडून युद्ध घोषित करण्याचे विशेष अधिकार

इस्रायलच्या पंतप्रधानांना संसदेकडून युद्ध घोषित करण्याचे विशेष अधिकार

जेरूसलेम  – इस्रायलच्या संसदेने आपल्या पंतप्रधानांना युद्ध घोषित करण्याचे विशेष अधिकार बहाल केले आहेत. इस्रायलच्या संसदेने याबाबतचे विधेयक मंजूर करून यासंदर्भातील आधीच्या कायद्यात सुधारणा केल्या. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू संरक्षणमंत्री एवीग्दोर लिबरमन यांच्या सहमतीने कुठल्याही क्षणी युद्ध घोषित करू शकतात. इस्रायल आणि इराणमधला तणाव विकोपाला गेला असून दोन्ही देशांमध्ये कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो. अशा परिस्थितीत इस्रायलच्या संसदेने पंतप्रधानांना हे विशेष अधिकार बहाल केल्याचे दिसते.

सोमवारी इस्रायलची संसद ‘क्नॅसेट’मध्ये युद्धाच्या घोषणेबाबतच्या कायद्यातील बदलांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आधीच्या कायद्यानुसार इस्रायलच्या पंतप्रधानांना युद्धाची घोषणा करण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचा पाठिंबा मिळणे आवश्यक होते. पण संसदेने केलेल्या नव्या बदलामुळे आणिबाणीच्या परिस्थितीत पंतप्रधान नेत्यान्याहू संरक्षणमंत्री लिबरमन यांच्या सहमतीने तत्काळ युद्धाची घोषणा करू शकतात. हे विशेष अधिकार पंतप्रधानांच्या हाती सोपवून इस्रायलच्या संसदेने इराणसह सार्‍या जगाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इराणने आजवर जगाची फसवणूक करून अण्वस्त्रे संपादन केल्याचा आरोप करणारी पत्रकार परिषद संबोधित केली होती. याच्या आधी इस्रायलच्या संसदेने सदर विधेयक संमत केले होते.

सध्या सिरियात विविध देशांचे लष्कर व समर्थक गटांमध्ये घुमश्‍चक्री सुरू आहे. याचा लाभ घेऊन इराण सिरियामध्ये आपले लष्करी तळ उभारित आहे. तसेच हिजबुल्लाह ही इराणसमर्थक कडवी संघटना देखील सिरियात कार्यरत आहे. सिरिया हा इस्रायलचा शेजारी देश असून सिरियातील इराणचा लष्करी प्रभाव म्हणजे इस्रायलच्या सुरक्षेला असलेला थेट धोका ठरतो, असे इस्रायलने अनेकवार बजावले होते. म्हणूनच इस्रायलने अनेकवार सिरियातील हिजबुल्लाह व इराणच्या तळांवर हल्ले चढविले होते. त्यातही गेल्या काही आठवड्यात इस्रायलने सिरियावरील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे.

या हल्ल्यांच्या विरोधात सिरियासह इराण व रशिया देखील इस्रायलला इशारे देत आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी केलेल्या कारवाईत इराणचे सात लष्करी सल्लागार ठार झाल्यानंतर इराणने याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल असे बजावले होते. रशियाने देखील या विरोधात इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतली होती. पण कुणाच्याही विरोध आणि धमक्यांची पर्वा न करता इस्रायल यापुढेही सिरियाच्या हवाई क्षेत्रात मुक्तपणे कारवाई करणार असल्याचे इस्रायलचे संरक्षणमंत्री लिबरमन यांनी जाहीर केले होते. तर इस्रायलच्या विनाशाची घोषणा करणार्‍या कुठल्याही देशाला अण्वस्त्रे मिळू देणार नाही, हे इस्रायलचे पारंपरिक धोरण आहे, याची आठवण संयुक्त राष्ट्रसंघातील इस्रायलच्या राजदूतांनी नुकतीच करून दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर इस्रायल आणि इराण यांच्यात कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडून या युद्धाच्या खाईत सारे आखाती देश ओढले जातील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र युद्ध पेटेलच तर त्याला तोंड देण्याची इस्रायलची पूर्ण तयारी आहे, याची जाणीव इस्रायलचे नेते इराणसह आपल्या इतर शत्रूदेशांना करून देत आहेत. वेळ पडलीच तर सिरिया आणि इराणला साथ देणार्‍या रशियाशीही टक्कर घेताना इस्रायल कचरणार नाही, असा संदेशही इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलच्या संसदेने घेतलेल्या आक्रमक निर्णयाचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले असून नजिकच्या काळात याचे फार मोठे परिणाम संभवतात.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/991593226304798720
https://www.facebook.com/WW3Info/posts/389216931486797