Breaking News

रशियाबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका दुसरे आरमार सक्रिय करणार

वॉशिंग्टन – रशियन नौदलाकडून वाढत असलेल्या आव्हानाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ने ‘उत्तर अटलांटिक महासागरा’तील आपले दुसरे आरमार पुन्हा सक्रिय करण्याची घोषणा केली. यासाठी अमेरिकेने अडीचशे सैनिकांच्या तातडीच्या तैनातीची योजना आखली आहे. अमेरिकन नौदलाचे ‘ऑपरेशन्स प्रमुख’ अ‍ॅडमिरल जॉन रिचर्डसन यांनी ही माहिती दिली.

२०११ साली माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकाळात उत्तर अटलांटिक महासागर क्षेत्रात गस्त घालणार्‍या ‘दुसर्‍या आरमारा’ला सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालिन संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी यासंबंधी आदेश दिले होते. त्यानंतर पुढील आठ वर्षे उत्तर अटलांटिक क्षेत्रातील गस्तीची जबाबदारी अमेरिकेच्या नौदलातील विनाशिकांवर होती. विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांचा ताफा या गस्तीतून बाद करण्यात आला होता.

मात्र, ‘अमेरिकेच्या सुरक्षेला मिळत असलेली आव्हाने लक्षात घेता महासत्तांमधील स्पर्धेचा काळ पुन्हा उदयाला येत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी दुसरे आरमार सक्रिय करणे आणि युद्धनौका, लढाऊ विमाने, मरिन्सची तैनाती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे’, अशी घोषणा अ‍ॅडमिरल रिचर्डसन यांनी केली. येत्या १ जुलै पासून दुसरे आरमाराची तैनाती करण्यात येणार असून या आरमाराची जबाबदारी नौदलाच्या ११ अधिकार्‍यांवर असेल, अशी माहिती रिचर्डसन यांनी दिली.

आधीप्रमाणे दुसर्‍या आरमाराचे मुख्य तळ ‘नॉरफ्लॉक’ येथे असेल. या आरमारात विमानवाहू युद्धनौका असेल का, हे स्पष्ट झालेले नाही. पण मध्य आणि लॅटिन अमेरिकेतील लष्करी कारवाईची पूर्ण जबाबदारी या आरमारावर असेल. येत्या काळात या आरमाराची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे संकेत पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांनी दिले. दुसर्‍या आरमाराच्या पुनरूज्जीवनामुळे युरोपमधील अमेरिकेच्या आरमारावरील ताण कमी होईल, असा दावा अमेरिकेचे नौदल अधिकारी करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी युरोपमधील अमेरिकेच्या कमांडप्रमुखांनी रशियन तसेच चीन व इराणी नौदलाच्या वाढत्या हालचाली अधोरेखित करून दुसर्‍या आरमाराची आवश्यकता व्यक्त केली होती.

दरम्यान, रशिया आणि चीनकडून वाढत असलेल्या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या नौदलाची क्षमता वाढविण्याची घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी जानेवारी महिन्यात केली होती. अमेरिकेला आपले सागरी सामर्थ्य टिकवायचे असेल तर नौदलाचा विस्तार करणे आणि मित्रदेशांबरोबरील सहकार्य व्यापक करण्याचे मॅटिस म्हणाले. होते. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलातील युद्धनौका आणि पाणबुड्यांची संख्या वाढविण्याचेही संरक्षणमंत्री मॅटिस यांनी जाहीर केले होते.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/993396875700027392
https://www.facebook.com/WW3Info/posts/391011541307336