इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यानंतर खवळलेल्या इस्रायलचे सिरियातील इराणच्या तळांवर भीषण हल्ले

इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यानंतर खवळलेल्या इस्रायलचे सिरियातील इराणच्या तळांवर भीषण हल्ले

जेरूसलेम – अमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्यानंतर तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडेल, ही जाणकारांनी व्यक्त केलेली चिंता प्रत्यक्षात उतरली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला काही तास उलटत नाही तोच, इराणने सिरियातून इस्रायलच्या गोलान सीमेवर सुमारे २० क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्सचे घणाघाती हल्ले चढविले. या हल्ल्यामागे सिरियात तैनात असलेले इराणचे कुद्स फोर्स हे लष्करी पथक असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. या हल्ल्यानंतर खवळलेल्या इस्रायलने आपल्या २८ लढाऊ विमानांद्वारे सिरियातील इराणच्या तळांवर ६०हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यात इराणचे सुमारे २४ जवान ठार झाले असून इराणच्या सिरियातील लष्करी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट झाल्याचे इस्रायलच्या संरक्षणमंत्री एवीग्दोर लिबरमन यांनी म्हटले आहे.

गोलान सीमा, हल्ले, एवीग्दोर लिबरमन, अणुकरार, इराण, लष्करी हालचाली, सिरिया, सजेर्ई लॅव्हरोव्ह

अमेरिकेने अणुकरारातून माघार घेण्याची तयारी केल्यानंतर इराणच्या सिरियातील लष्करी हालचाली वाढल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन इस्रायलने सिरियाला भिडलेल्या आपल्या गोलान सीमारेषेवरील लष्करी तैनाती व सज्जता वाढवून इथे ‘बॉम्ब शेल्टर्स’ तयार ठेवले होते. अपेक्षेनुसार इराणने सिरियातून इस्रायलच्या गोलान सीमेवरील लष्करी चौक्यांना लक्ष्य करणारे क्षेपणास्त्रे तसेच रॉकेट्सचे हल्ले केले. बुधवारच्या संध्याकाळपासून हे हल्ले सुरू झाल्याची माहिती इस्रायली संरक्षणदलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल ‘जोनाथन कॉनक्रीअस’ यांनी दिली. सिरियामध्ये तैनात असलेल्या इराणच्या कुद्स फोर्स या लष्करी पथकाचे नेतृत्व करणारे जनरल कासिम सुलेमानी यांच्या आदेशावरून हे हल्ले झाले, अशी माहिती ले. कर्नल कॉनक्रीअस यांनी दिली.

इराणने डागलेली काही क्षेपणास्त्रे व रॉकेटस् इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने भेदली. तर काही रॉकेटस् व क्षेपणास्त्रे इस्रायलच्या लष्करी चौक्यांजवळ कोसळली असली तरी त्याने फार मोठी हानी झालेली नाही, असा दावा इस्रायली संरक्षणदलाच्या प्रवक्त्यांनी केला. मात्र हा इराणने इस्रायलवर केलेला पहिलाच हल्ला ठरतो. त्यामुळे या हल्ल्यानंतर खवळलेल्या इस्रायलने आपली ‘एफ-१५’ आणि ‘एफ-१६’ विमाने सिरियात रवाना केली आणि सिरियातील इराणच्या लष्करी तळांवर प्रलयंकारी हल्ले चढविले.

सुमारे दोन तास इस्रायलच्या लढाऊ विमानांचे हे हल्ले सुरू होते. यासाठी एकूण २८ विमानांचा वापर झाला असून या लढाऊ विमानांनी ६० हून अधिक क्षेपणास्त्रे डागून इराणच्या सिरियातील पायाभूत सुविधा नष्ट केल्या. या ठिकाणांमध्ये सिरियाची राजधानी दमास्कसजवळील ‘मेझेह’, ‘मेतूला’ या दोन प्रमुख लष्करी तळांचा समावेश आहे. हे हल्ले सुरू असताना गोलान सीमेवरून इस्रायली लष्कराने सिरियावर दहापेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली. हे हल्ले कमालीचे यशस्वी ठरले, असा दावा इस्रायलचे संरक्षणमंत्री लिबरमन यांनी केला.

‘इस्रायलच्या या हल्ल्यात सिरियातील इराणच्या जवळपास सर्वच लष्करी सुविधा नष्ट झाल्या आहेत. तुम्ही आमच्यावर वर्षावर केलात, तर तुमच्यावर वादळी प्रपात कोसळेल, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण आता संपले आहे आणि यातून सर्वांना योग्य तो धडा मिळाला असेल’, अशा जहाल शब्दात इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली.

तर इस्रायली संरक्षणदलाच्या प्रवक्त्यांनी मात्र ‘हे प्रकरण इथेच संपलेले नाही’, असे बजावून पुढच्या काळात अशा हल्ल्यांची मालिका सुरू राहील, असे संकेत दिले आहेत. त्याचवेळी ‘इराणला या हल्ल्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागेल’, असा टोला ले. कर्नल कॉनक्रीअस यांनी लगावला.

सिरियन वृत्तवाहिन्यांनी मात्र इस्रायलने डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी ५० टक्के इतकी क्षेपणास्त्रे आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने भेदली, असा दावा केला. रशियन माध्यमांनीही हा दावा उचलून धरला आहे. त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सजेर्ई लॅव्हरोव्ह यांनी इस्रायल व इराणमध्ये चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे.

‘इराणने मात्र सिरियातील आपले लष्करी तळ व सैन्य तैनात नाही’, असे सांगून इस्रायलचा दावा नाकारला आहे. तसेच सिरियाच्या भूभागातून इराणने इस्रायलवर हल्ले चढविलेले नाहीत, असे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे उपप्रमुख जनरल हुसेन सलामी यांनी म्हटले आहे. जर इराणने हे हल्ले चढविले असते, तर त्याची घोषणा करण्यात आली असती, असा दावा जनरल सलामी यांनी केला.

‘शत्रू इराणशी थेट लष्करी संघर्ष करण्याच्या तयारीत नाहीत. तर ते इराणवर आर्थिक निर्बंध लादून त्याच्या दडपणाखाली इराणला झुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा काळात राजनैतिक वाटाघाटींचा पर्याय इराणसमोर असू शकत नाही. संघर्ष हाच एकमेव मार्ग आहे’, असे जनरल सलामी यांनी म्हटले आहे.

इस्रायलने नकाशासह हल्ल्याचे तपशील उघड केले

सिरियातील संघर्षाचा फायदा घेऊन इराण सिरियाचे रुपांतर आपल्या लष्करी तळात करीत असल्याचा इस्रायलचा आरोप होता. तर इराणने हे आरोप नाकारले होते. मात्र गुुरुवारी इस्रायलने सिरियात आजवरचे सर्वात भीषण हल्ले चढवून इराणचे लष्करी तळ आणि पायाभूत सुविधा नष्ट करून टाकल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या संरक्षणदलांनी या हल्ल्याचे तपशील जगजाहीर केले असून या हल्ल्याच्या ठिकाणांचे नकाशेही प्रसिद्ध केले आहेत.

सिरियातील इराणच्या या ठिकाणांमध्ये शस्त्रसाठा असलेली कोठारे आणि गुप्तचर विभागाच्या केंद्रांचा समावेश आहे. १९७४ साली झालेल्या अरब देश आणि इस्रायलच्या युद्धानंतर, इस्रायलने गुरुवारी सिरियावर केला, इतका मोठा हल्ला कधीही चढविला नव्हता, अशी माहिती इस्रायलच्या एका अधिकार्‍याने दिली.

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info