जेरूसलेम – इस्रायली संसदेमध्ये स्वतंत्र कुर्दिस्तानला मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. इराक, सिरिया आणि तुर्कीमध्ये विखुरलेल्या कुर्दवंशियांना आपला स्वतंत्र देश स्थापन करण्याचा अधिकार असल्याचा दावा इस्रायलने याआधीच केला होता. इराकमधील कुर्दांच्या स्वातंत्र्याला इस्रायलने सक्रिय पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी सदर विधेयक संसदेत मांडण्याची तयारी केली आहे.
इराकमधील कुर्दवंशियांनी सार्वमत घेऊन आपल्या स्वातंत्र्याच्या दिशेने पावले उचलली होती. सर्वात आधी इस्रायलने त्याला पाठिंबा दिला. इराकच्या उत्तरेकडील इंधनसंपन्न भागात कुर्दवंशियांचे प्राबल्य असून इस्रायलच्या या पाठिंब्यानंतर, इथल्या इंधनाचा इस्रायलला पुरवठा सुरू झाला होता. यानंतर सिरियातील कुर्दांनी स्वातंत्र्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. तर तुर्कीमधील कुर्दवंशियही यासाठी प्रयत्न करू लागल्याचे उघड झाले होते. इस्रायल व अमेरिका इराक, सिरिया, तुर्कीमध्ये वसलेल्या कुर्दांचा स्वतंत्र देश स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असून याकरीता या देशांची विभागणी करण्याचीही त्यांची तयारी झाल्याचा आरोप सुरू झाला होता.
यामुळे अमेरिकेचा निकटतम सहकारी देश असलेला तुर्की अमेरिकेपासून दुरावला होता. पण आता इस्रायलच्या संसदेतच कुर्दांच्या स्वतंत्र देशाचा ठराव मंजूर होत असून या निर्णयाचे जबरदस्त परिणाम पुढच्या काळात समोर येऊ शकतील. लिकूड आणि ‘यिस्रायेल बैतेनु’ या इस्रायलमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी सदर प्रस्ताव संसदेत मांडण्याची तयारी केली आहे. यामुळे इराक व सिरिया तसेच तुर्कीमधील कुर्दवंशिय बंडखोर संघटना पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने उभ्या राहू शकतात. यामुळे इराक, सिरिया आणि तुर्कीमधील परिस्थिती बदलू शकते.
सिरियामधील कुर्द बंडखोर संघटना आपल्या देशात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करून तुर्कीने याआधीच सिरियातील कुर्दांच्या संघटनांवर हल्ले चढविले होते. या पार्श्वभूमीवर, इस्रायली संसदेने कुर्दांच्या स्वतंत्र देशाला मान्यता देणारा प्रस्ताव संमत केला तर तुर्की हे आपल्या सार्वभौमत्त्वावरील आक्रमण असल्याचा दावा ठोकू शकतो. यानंतर चवताळलेल्या तुर्कीच्या या क्षेत्रातील कुर्द बंडखोरांच्या विरोधातील कारवाया अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कुर्दांच्या स्वातंत्र्याला अधिकृतरित्या मान्यता देणार्या इस्रायलकडून कुर्द संघटनांना अधिक प्रमाणात पाठिंबा व सक्रिय सहाय्य मिळू शकते.
यामुळे आखातात सुरू असलेल्या घुमश्चक्रीत नवी आघाडी उघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |