दक्षिण सिरियातील संघर्षात इराण हस्तक्षेप करणार नसल्याचे संकेत
रियाध/अम्मान – इस्रायलच्या सर्वनाशाची घोषणा करणार्या इराणने स्वतःहून पुढाकारघेऊन इस्रायलबरोबर गोपनीय चर्चा सुरू केल्याची चकीत करणारी माहिती समोर आली आहे. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये इराणचे राजदूत ‘मुस्ताफ मोसलेहजादेह’ यांची इस्रायली गुप्तचर यंत्रणांच्या अधिकार्यांबरोबर चर्चा पार पडली, असा गौप्यस्फोट सौदी अरेबियाच्या संकेतस्थळाने केला. सिरियात इस्रायलने इराणच्या तळावर चढविलेल्या घणाघाती हल्ल्यांमध्ये इराणचे जबर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलबरोबरील या चर्चेसाठी पुढाकार घेतला, असा दावा सौदीच्या संकेतस्थळाने केला आहे.
गेल्या आठवड्यात जॉर्डनची राजधानी अम्मानमधील एका हॉटेलमध्ये इस्रायल व इराणच्या अधिकार्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेसाठी जॉर्डनने मध्यस्थाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. अम्मानच्या हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेपूर्वी इस्रायल व इराणमध्ये जॉर्डनच्या मध्यस्थीने संदेशांची देवाणघेवाण सुरू होती, अशी माहिती ‘एलाफ’ या सौदी संकेतस्थळाने दिली.
इराणचे जॉर्डनमधील राजदूत ‘मुस्ताफ मोसलेहजादेह’ व इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोस्साद’चे उपप्रमुख यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चा पार पडली. चर्चेत इराणचे तसेच इस्रायलचे लष्करी अधिकारीही सहभागी झाले होते. इस्रायलकडून सिरियातील इराणच्या तळांवर होणारे हल्ले व त्यात झालेले जबरदस्त नुकसान, या पार्श्वभूमीवर इराणने संघर्ष टाळण्याबाबत प्रस्ताव पुढे केला होता, अशी माहिती चर्चेत सहभागी झालेल्या सूत्रांनी दिल्याचे वृत्त ‘एलाफ’ने दिले आहे.
चर्चेदरम्यान दक्षिण सिरियातील इस्रायल-जॉर्डन सीमेनजिक असलेल्या ‘दारा’ व ‘कुनित्रा’ या भागातील संघर्षात सहभागी न होण्याच्या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. इराणचे लष्कर, ‘हिजबुल्लाह’ तसेच समर्थक संघटना दक्षिण सिरियातील सिरियन लष्कराच्या मोहीमेत सामील होणार नाहीत. इस्रायल ‘जॉर्डन-इस्रायल सीमा’ तसेच गोलान टेकड्यांच्या भागात सिरियन लष्कर व बंडखोरांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात हस्तक्षेप करणार नाही, असे इस्रायलने मान्य केले. त्याचवेळी जॉर्डननेही आपल्या सीमेतून सिरियात बंडखोर घुसू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
सिरियातील संघर्षाच्या मुद्यावरून इराण व इस्रायलमध्ये अशा रितीने चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इराणने यापूर्वी सातत्याने इस्रायलच्या विनाशाच्या धमक्या देऊन तेल अवीव व इतर शहरांवर आक्रमक क्षेपणास्त्र हल्ले चढविण्याचे इशारे दिले होते. मात्र प्रत्यक्षात सिरियाच्या मुद्यावरून झालेल्या संघर्षात इस्रायलने इराणला चांगलाच तडाखा दिल्याचे समोर आले.
इस्रायलने सिरियातील इराणच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे शेकडो जवान ठार झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी या तळांवरील इराणचा मोठा शस्त्रसाठाही नष्ट करण्यात इस्रायलला यश मिळाले आहे. या हल्ल्यांसाठी इस्रायलने ‘एफ-35’ या प्रगत अमेरिकी लढाऊ विमानांचा वापर केल्याचे समोर आले होते.
इस्रायलच्या या तडाख्यामुळेच इराणने नमते घेऊन थेट चर्चेचा प्रस्ताव पुढे केला असावा, असे सांगण्यात येते. चर्चेदरम्यान इस्रायलने इराणला सिरियातील संभाव्य हस्तक्षेपाबाबत खरमरीत इशारा दिल्याचेही सांगण्यात येते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/1001907454249123840 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/399673423774481 |