‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनचा ऑस्ट्रेलियन वैमानिकावर लेझर हल्ला – ऑस्ट्रेलियन युद्धनौकेसह प्रवास करणार्‍या अभ्यासकाचा आरोप

‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनचा ऑस्ट्रेलियन वैमानिकावर लेझर हल्ला – ऑस्ट्रेलियन युद्धनौकेसह प्रवास करणार्‍या अभ्यासकाचा आरोप

डार्विन – ‘साऊथ चायना सी’मधून प्रवास करणार्‍या ऑस्ट्रेलियन हेलिकॉप्टरवर चीनने ‘लेझर’चा हल्ला चढविला. ऑस्ट्रेलियन वैमानिकासह चीनने या सागरी क्षेत्रात मासेमारी करणार्‍या आग्नेय आशियाई देशांच्या मच्छिमार नौकांवरही लेझरचा हल्ला चढविल्याचा आरोप होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘एचएमएएस कॅनबेरा’ या अ‍ॅम्फिबियस युद्धनौकेतून प्रवास करणार्‍या अभ्यासकाने हा आरोप केला. गेल्या वर्षी चीनने ‘ईस्ट चायना सी’ आणि आफ्रिकेतील जिबौती येथील लष्करी तळाजवळ अमेरिकेच्या विमानांविरोधात ‘लेझर’चा वापर केला होता.

चीनने आंतरराष्ट्रीय नियमांची पर्वा न करता आपल्या प्रतिस्पर्धींवर अतिप्रगत शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या ऑस्ट्रेलियन हेलिकॉप्टर तसेच मच्छिमार नौकांवर ‘लेझर’चे चढविलेले हल्ले चीनच्या आक्रमकतेचे उदाहरण असल्याची आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. आशियाई देशांबरोबरचे सहकार्य दृढ करण्यासाठी ‘इंडो-पॅसिफिक एडिवर २०१९’ या सागरी मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलियन नौदलाच्या युद्धनौका गेले तीन महिने विशेष सफरीवर होत्या.

या तीन महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन नौदलातील चार युद्धनौका, विमान आणि सुमारे १२०० नौसैनिक सात आशियाई देशांचा दौरा केला. यामध्ये ‘एचएमएएस कॅनबेरा’ या अ‍ॅम्फिबियस युद्धनौकेचाही समावेश होता. ऑस्ट्रेलियन युद्धनौका काही दिवसांपूर्वी व्हिएतनाममार्गे सिंगापूरला जात असताना, ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीनने ही कारवाई केली.

ऑस्ट्रेलियन नौदलाचे ‘एअर कमोडोर रिचर्ड ओवेन’ यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिनी विनाशिकांनी आपल्या युद्धनौकांचा धोकादायक पाठलाग केल्याचे सांगितले. याप्रकरणी ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्रालयाला सुचित केल्याचे कमोडोर ओवेन म्हणाले. पण ऑस्ट्रेलियन युद्धनौकेबरोबर प्रवास करणारे अभ्यासक ‘युआन ग्रॅहम’ यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना, चीनने केलेल्या ‘लेझर’च्या हल्ल्यांची माहिती दिली.

चीनच्या विनाशिकांनी ऑस्ट्रेलियन युद्धनौकेचा धोकादायक पाठलाग केल्यानंतर ‘कॅनबेरा’वरील हेलिकॉप्टरने उड्डाण करून आपल्या चारही युद्धनौकांना साथ दिली होती. पण यावेळी चीनने हेलिकॉप्टरवरील वैमानिकावर ‘लेझर’चा हल्ला केला. लेझर हल्ल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याआधी वैमानिकाने हेलिकॉप्टर ‘कॅनबेरा’वर उतरविले. या घटनेत कुठलीही हानी झाली नाही. पण घडला प्रकार ‘साऊथ चायना सी’मधील आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्य धोक्यात टाकणारा असल्याची टीका ग्रॅहम यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी ‘ईस्ट चायना सी’च्या क्षेत्रात गस्त घालणार्‍या अमेरिकेच्या विमानावर चीनने ‘लेझर’ रोखले होते. तर उत्तर आफ्रिकेतील जिबौती येथील लष्करी तळावर परतणार्‍या अमेरिकेच्या लढाऊ विमानावर जवळच असलेल्या चीनच्या लष्करी तळावरुन ‘लेझर’ हल्ले चढविण्यात आले होते. या हल्ल्यात अमेरिकी वैमानिक जबर इजा होण्यापासून बचावला, असे सांगून अमेरिकेने चीनवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या हेलिकॉप्टरवर चीनकडून झालेला हा हल्ला या क्षेत्रात वेगवान घटनांची मालिका सुरू करणारा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियात स्कॉट मॉरिसन यांचे सरकार पुन्हा सत्तेवर आले असून त्यांच्या चीनविरोधी धोरणांमुळे उभय देशांचे संबंध विकोपाला जातील, अशी चिंता चीनने व्यक्त केली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info