अमेरिकन संरक्षणदलाच्या संचालकांचा चीनला इशारा
वॉशिंग्टन – ‘सागरी क्षेत्रात अडचण ठरणार्या बेटांना नष्ट करणे हे योग्यच ठरते. अशा बेटांना नष्ट करण्याची क्षमता अमेरिकेकडे नक्कीच आहे. याच्या आधीही अमेरिकेच्या लष्कराने अशी कारवाई केली होती’, असे अमेरिकेच्या संरक्षणदलाचे संचालक लेफ्टनंट जनरल ‘केनिथ मॅकॅ्न्झी’ यांनी म्हटले आहे. मॅकॅ्न्झी यांची सदर घोषणा ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या कृत्रिम बेटांच्या लष्करीकरणासाठी इशारा ठरत आहे.
काही तासांपूर्वी अमेरिकेने ‘आशिया-पसिफिक’ कमांडचे नाव बदलून ‘इंडो-पॅसिफिक’ असे केले. भारताचे महत्त्व अधोरेखित करून तयार झालेल्या या नव्या कमांडबाबत माहिती देताना मॅकॅ्न्झी यांनी अमेरिकेची भूमिका सुस्पष्ट केली. यासाठी मॅकॅ्न्झी यांनी दुसर्या महायुद्धातील अमेरिकी लष्कराच्या कारवाईचा संदर्भ दिला.
दुसर्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या लष्कर व नौदलाने पॅसिफिक महासागर क्षेत्रात काही महत्त्वाच्या मोहिमा राबविल्या होत्या. या सागरी क्षेत्रातील काही निर्जन आणि विखुरलेल्या बेटांवर ताबा मिळविला तर यातली काही बेटे नष्ट केली होती, याची आठवण लेफ्टनंट जनरल मॅकॅ्न्झी यांनी करून दिली. ‘या संघर्षात अमेरिकेला जीवितहानी सोसावी लागली होती. पण अशा बेटांवर कारवाई करण्याचा अनुभव आणि क्षमता अमेरिकेच्या लष्कराकडे आहे’, असे मॅकॅ्न्झी यांनी बजावले.
त्याचबरोबर कोणत्याही कारणांमुळे ‘इंडो-पॅसिफिक’ सागरी क्षेत्रातील अमेरिकेच्या हालचाली कमी होणार नाहीत. व्यापारी वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून या सागरी क्षेत्रातील गस्त सुरू राहणार असल्याचेही मॅकॅ्न्झी यांनी जाहीर केले. मात्र आपण फक्त ऐतिहासिक तथ्य मांडले असून यातून दुसरा अर्थ काढू नये, अशी अपेक्षा अमेरिकेच्या संरक्षणदलाच्या संचालकांनी व्यक्त केली. पण ‘साऊथ चायना सी’प्रश्नी चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मॅकॅ्न्झी यांची घोषणा चीनसाठी इशारा असल्याचा दावा अमेरिकन विश्लेषक करीत आहेत.
‘साऊथ चायना सी’बाबत अमेरिका आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चार दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी या सागरी क्षेत्रात गस्त घातली होती. या दोन्ही युद्धनौकांनी ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या ‘वुडी आयलँड’ या कृत्रिम बेटांजवळून प्रवास केला होता. आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अमेरिकेच्या युद्धनौकांनी ही गस्त घातल्याचे अमेरिकेच्या नौदलाने जाहीर केले होते.
तर अमेरिकेच्या ‘आशिया पॅसिफिक कमांड’चे माजी प्रमुख अॅडमिरल हॅरी हॅरिस यांनी युद्धनौकांच्या गस्तीचेही समर्थन केले. ‘‘‘साऊथ चायना सी’मधील बेटांचे लष्करीकरण करून चीनने आपल्या वचनांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या सागरी क्षेत्रातील बेटांचे लष्करीकरण करणार्या चीनविरोधात अमेरिकाही संघर्ष सुरू ठेवेल’’, असा इशारा अॅडमिरल हॅरिस यांनी दिला होता. अमेरिकी कमांडप्रमुखांच्या या इशार्यावर चीनकडून प्रतिक्रिया आली होती.
‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या लष्करीकरणाचा मुद्दा अमेरिका अतिशयोक्तिपूर्ण पद्धतीने मांडत असल्याची टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ‘हुआ चुनयिंग’ यांनी केली. तसेच चीनवरील हे आरोप हास्यास्पद असल्याचे ताशेरे चुनयिंग यांनी ओढले होते. आता मॅकॅ्न्झी यांनी अमेरिकेकडे बेटे नष्ट करण्याची क्षमता असल्याची आठवण करून दिल्याने, चीनकडून यावरही तीव्र प्रतिक्रिया येण्याची दाट शक्यता आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/1002876123502350337 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/400499130358577 |