सौदीचे राजे सलमान यांची धमकी
रियाध – ‘‘कतारने रशियाकडून ‘एस-४००’ या विमानभेदी यंत्रणेची खरेदी केली तर ही यंत्रणा नष्ट करण्यासाठी सौदी अरेबिया कोणतेही पाऊल उचलू शकेल. त्यासाठी लष्करी कारवाई करता येईल’’, अशी धमकी सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी दिली. सौदीच्या राजांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना लिहिलेल्या पत्रात ही धमकी दिल्याचा दावा फ्रान्समधील आघाडीच्या दैनिकाने केला.
गेल्या दीड वर्षापासून सौदी आणि कतार यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. कतार हा इराण तसेच दहशतवादी संघटनांना सहाय्य करणारा देश असल्याचा आरोप करून सौदी आणि आखातातील इतर अरब मित्रदेशांनी कतारवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. कतारने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. तसेच सौदी व अरब देशांनी टाकलेल्या निर्बंधानंतर कतारने सहकार्यासाठी रशियाबरोबर संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती.
जानेवारी महिन्यात रशियाबरोबर ‘एस-४००’च्या खरेदीबाबत चर्चा झाल्याचे कतारने जाहीर केले होते. यावर सौदीने आपली नाराजी व्यक्त केली होती. पण पाच महिन्यानंतर सौदीने कतार व रशियातील या ‘एस-४००’च्या खरेदीबाबत सौदीच्या राजांनी लिखित स्वरूपात धमकी दिल्याचा दावा फ्रेंच वृत्तपत्राने केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशिया व कतारमधील सहकार्य थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सौदीच्या राजांनी केले. सौदीच्या राजांनी लिहिलेले पत्र आपल्या हाती लागल्याचा दावा फ्रेंच वृत्तपत्राने केला.
फ्रेंच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीवर सौदी तसेच फ्रान्सने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सौदीने याआधीही रशिया आणि कतारमध्ये सुरू असलेल्या ‘एस-४००’च्या वाटाघाटींवर टीका केली होती. पण सौदीच्या राजांनी कतारवर थेट लष्करी कारवाईचा इशारा दिल्यामुळे आखातातील तणावात नवी भर पडली आहे. दरम्यान, सौदी अरेबियाही रशियाकडून ही हवाईसुरक्षा यंत्रणा खरेदी करण्यासाठी चर्चा करीत असल्याने याबाबतचा गुंता अधिकच वाढल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/1003555166308536320 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/401182156956941 |