अमेरिका-युरोप व्यापारयुद्ध केव्हाच सुरू झाले आहे – फ्रान्सचे अर्थमंत्री ‘ली मेर’

अमेरिका-युरोप व्यापारयुद्ध केव्हाच सुरू झाले आहे – फ्रान्सचे अर्थमंत्री ‘ली मेर’

पॅरिस – ‘अमेरिका व युरोपमध्ये व्यापारयुद्ध होणार की नाही, हा प्रश्‍नच उरलेला नाही. याचे कारण म्हणजे अमेरिका व युरोपातील व्यापारयुद्ध केव्हाच सुरू झाले आहे’, असा दावा फ्रान्सचे अर्थमंत्री ‘ब्रुनो ली मेर’ यांनी केला. त्याचवेळी अमेरिकेने युरोपविरोधात नवी कारवाई केलीच तर युरोपने एकजुटीने त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, असे फ्रेंच अर्थमंत्र्यांनी बजावले आहे.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युरोपिय महासंघ चीनइतकाच वाईट असल्याचे सांगून युरोपिय देशांना नव्या करांची धमकी दिली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना युरोपिय महासंघाने, युरोपवर कर लादल्यास त्याचा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेलाच बसेल, असा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही ट्रम्प यांनी युरोपविरोधातील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

अमेरिका-युरोप, व्यापारयुद्ध, ली मेर, अमेरिकी अर्थव्यवस्था, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, कारवाई, पॅरिस, चीन, WW3, US Europe, trade war

युरोपातील प्रमुख व्यापारी देश असणार्‍या जर्मनी व फ्रान्सकडून ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून फ्रेंच अर्थमंत्र्यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग आहे. ‘जर उद्या अमेरिकेने युरोपिय मोटरींवरील कर वाढविला तर युरोपने त्याला एकजुटीने प्रत्युत्तर द्यायला हवे. युरोप एक सार्वभौम शक्ती आहे, हे दाखवून अमेरिकेला जबरदस्त प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे’, असे फ्रान्सचे अर्थमंत्री मेर यांनी बजावले. त्याचवेळी अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धाच्या मुद्यावर कोणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नको, कारण ते आधीच सुरू झाले आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

फ्रेंच अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यापाठोपाठ जर्मनीच्या सत्ताधारी आघाडीतील ‘एसपीडी’ पक्षाकडूनही अमेरिकेच्या धोरणावर तीव्र नाराजीची प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेचे जर्मनीतील राजदूत रिचर्ड ग्रेनेल जर्मन कंपन्यांबरोबर चर्चा करीत असल्याचे वृत्त उघड झाले होते. त्यामुळे संतापलेल्या ‘एसपीडी’ पक्षाच्या नेत्या ‘अँड्रिआ नाह्लेस’ यांनी जर्मनी म्हणजे ‘बनाना रिपब्लिक’ नसल्याचे अमेरिकी नेतृत्त्वाला खडसावले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सातत्याने, चीन व युरोपिय देशांनी व्यापारात अमेरिकेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करीत असून यापुढे अमेरिका त्याविरोधात आक्रमक कारवाई असे बजावले आहे. स्वस्त पोलाद व अ‍ॅल्युमिनिअमवर कर लादून युरोपिय देशांना लक्ष्य करणार्‍या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेत येणार्‍या गाड्यांवर २० टक्के कर लादण्यात येईल, अशी धमकीही दिली होती.

गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युरोपला लक्ष्य केले होते. यावेळी त्यांनी युरोपिय महासंघाची तुलना थेट चीनबरोबर केल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. आपल्याला युरोप आवडत असला तरी ते अमेरिकेला सातत्याने अयोग्य रितीने वागवत आहेत, असा आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता.

ट्रम्प यांच्या या आरोपांना युरोपिय महासंघाने जोरदार प्रत्युत्तर दिले. महासंघाने अमेरिकेच्या व्यापार विभागाला लिहिलेल्या पत्रात अमेरिकेने युरोपिय गाड्यांवर २५ टक्के कर लादल्यास त्याचा अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पादनावर परिणाम होईल व सुमारे १४ अब्ज डॉलर्सचा फटका बसेल, असा इशारा दिला होता.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info