किव्ह: रशियाकडून पूर्व युक्रेनमधील गटांना होणार्या सहाय्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनचे हवाईदल तसेच नौदलाला प्रगत शस्त्रांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. एका ब्रिटीश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे युक्रेनमधील राजदूत कर्ट व्होल्कर यांनी युक्रेनच्या संरक्षणसहाय्यातील वाढीचे संकेत दिले. चार महिन्यांपूर्वीच युक्रेनला रणगाडाभेदी ‘जॅवलीन’ क्षेपणास्त्रे पुरविल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती.
दोन दिवसांपूर्वीच रशियाचे नौदल युक्रेननजिक असणार्या ‘सी ऑफ अझॉव्ह’मध्ये आक्रमक हालचाली करीत असल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली होती. रशियन नौदलाच्या हालचाली पूर्व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची व्याप्ती वाढविण्याच्या योजनेचा भाग असल्याचा दावाही अमेरिकेकडून करण्यात आला होता. त्यापाठोपाठ पूर्व युक्रेनमधील ‘डोनेत्स्क’चे स्वयंघोषित नेते अलेक्झांडर झाकारशेन्को स्फोटात ठार झाल्याची माहितीही समोर आली होती.
झाकारशेन्को यांच्या हत्येवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून त्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘पेट्रो पोरोशेन्को’ यांनी रशिया युक्रेनवरील हल्ल्यासाठी मोठी जमवाजमव करीत असल्याचा दावाही केला होता. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील अमेरिकी राजदूतांनी दिलेले संकेत महत्त्वपूर्ण मानले जातात.
अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला सुमारे २१० जॅवलीन क्षेपणास्त्रे दिली असून ही क्षेपणास्त्रे डागणारे ३७ लॉंचर्स देखील पुरविले आहेत. हा व्यवहार चार कोटी ७० लाख डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याव्यतिरिक्त घातक शस्त्रांचा पुरवठा करण्याचे अमेरिकेने टाळले होते. मात्र अमेरिकेने आपल्या धोरणात बदल करण्याची तयारी केली असून युक्रेनच्या संरक्षणसहाय्यात मोठी वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
युक्रेनचे लष्कर आपल्या देशाचे रक्षण करीत आहे, त्यामुळे त्यांना सहाय्य करणे नैसर्गिक असल्याचा दावा व्होल्कर यांनी केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |