वॉशिंग्टन – १९६० व १९९०च्या दशकात, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा पाया रचल्याचा दावा करून या क्षेत्रात ‘थर्ड वेव्ह’ सुरू करण्यासाठी तब्बल दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली. संरक्षण विभागाच्या ‘डिफेन्स अॅडव्हान्सड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी’ने(डार्पा) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, या गुंतवणुकीच्या माध्यमातून ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या नव्या पिढीचा पाया रचला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात चीन व रशियासारख्या देशानी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये आघाडीच्या पार्श्वभूमीवर नवी गुंतवणूक महत्त्वाची ठरते.
अमेरिकेच्या मेरीलॅण्ड प्रांतात नुकतीच ‘डार्पा’ची ‘डी६० सिम्पोसिअम’ नावाची परिषद पार पडली. या बैठकीच्या अखेरच्या दिवशी ‘डार्पा’चे संचालक स्टीव्हन वॉकर यांनी, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मधील महत्त्वाकांक्षी गुंतवणुकीची घोषणा केली. ‘डार्पा’कडून गेल्या सहा दशकात, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’बाबत करण्यात आलेल्या संशोधनातील मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन नवे सिद्धांत तसेच ‘अॅप्लिकेशन्स’ विकसित करण्यात येतील. हे सिद्धांत व ‘अॅप्लिकेशन्स’, यंत्रांना बदलत्या वातावरणाशी व स्थितीशी सहज जुळवून घेण्यास सहाय्यक ठरतील, असे ‘डार्पा’च्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
‘डार्पा’कडून ‘एआय नेक्स्ट’ ही नवी मोहीम हाती घेण्यात येणार असून त्याअंतर्गत सध्या ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाशी जोडलेले प्रकल्प व नव्या योजना एकत्र करण्यात येतील. त्यासाठी दोन अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स एक्सप्लोरेशन प्रोग्राम’ नव्या मोहिमेतील एक महत्त्वाचा भाग राहणार आहे. त्यात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्राचा भाग असलेल्या महत्त्वाकांक्षी व व्यवहार्य प्रकल्पांकडे खास लक्ष पुरविले जाणार असल्याचे ‘डार्पा’कडून सांगण्यात आले.
सध्या अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्रात ८०हून अधिक प्रकल्प सुरू असून त्यात ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम’चा वापर, ‘सायबरक्षेत्रातील धोक्यांवर उपाययोजना’ व ‘अॅडव्हान्सड् मशिन लर्निंग’ यासारख्या घटकांचा समावेश आहे. पुढील वर्षभरात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील नव्या प्रकल्पांची घोषणा होऊन कामाला सुरुवात होईल, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘ड्रोन्स’, ‘रोबोट्स’ तसेच युद्धनौकांमध्येही ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर केल्याची माहिती यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे.
नव्या महत्त्वाकांक्षी गुंतवणुकीमागे रशिया व चीनने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये घेतलेली आघाडी कारणीभूत असल्याचे मानले जाते. जो कोणी आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात नेतृत्त्व करू शकेल तो संपूर्ण जगावर राज्य करणारा ठरेल’, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्यावर्षी केला होता. भविष्यात रशिया या क्षेत्रात मागे पडू नये म्हणून लवकरच ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ बाबत वेगाने पावले उचलली जातील, अशी ग्वाहीदेखील राष्ट्राध्यक्षांनी दिली होती.
चीनने २०३० सालापर्यंत अमेरिकेला मागे टाकून ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून त्यासाठी ६० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |