राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व हुकूमशहा उन यांची ऐतिहासिक भेट

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व हुकूमशहा उन यांची ऐतिहासिक भेट

चर्चा सकारात्मक ठरल्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा

सिंगापूर – उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ यांच्याबरोबरील आपली भेट जबरदस्त ठरली, असे सांगून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ही ऐतिहासिक भेट यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. लवकरच उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त होईल, असा दावाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी अमेरिका व दक्षिण कोरियाचा युद्धसराव रद्द करण्याची घोषणा करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर कोरियाची मागणी स्वीकारली आहे. उत्तर कोरियासारख्या देशाला अण्वस्त्रे सोडून देण्यास भाग पाडल्याने ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाला फार मोठे यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

ऐतिहासिक भेट trump kim meetingसिंगापूरमध्ये झालेल्या या भेटीकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. या भेटीवर अनिश्‍चिततेचे सावट पडले होते. स्वतः ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या हुकूमशहांना पत्र लिहून सदर भेट रद्द करीत असल्याचे कळविले होते. मात्र नंतरच्या काळात उत्तर कोरियाने स्वीकारलेल्या तडजोडीच्या भूमिकेमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या भेटीला तयार झाले. मंगळवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व हुकूमशहा किम जाँग-उन यांच्यात सुमारे ४५ मिनिटांची चर्चा संपन्न झाली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या कराराचे तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत.

यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या भेटीवर समाधान व्यक्त केले. ही ऐतिहासिक भेट असल्याचे सांगून ट्रम्प यांनी याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असे स्पष्ट केले. उत्तर कोरियाच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाबाबत तसेच इतर विवाद्य मुद्द्यांवरील चर्चेमुळे उभय देशांच्या संबंधांमध्ये फार मोठी प्रगती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. गेल्या सात दशकात असा विचारही कुणी केला नव्हता, असा टोला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी लगावला. ‘मी इथे चर्चेसाठी कसा काय येऊ शकतो असा प्रश्‍न केला जातो. पण कोरियन देशातील कोट्यवधी नागरिकांना वाचविण्यासाठी मी कधीही अशा प्रकारे चर्चा करण्यास तयार असेन’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यावेळी म्हणाले.

ऐतिहासिक भेट trump kim meeting‘मात्र ही केवळ चर्चा होती, यानंतर राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू होतील. यासाठी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि त्यांची टीम यापुढे वाटाघाटीत सहभागी होईल’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले. त्याचवेळी उत्तर कोरियावर अमेरिकेने लादलेले निर्बंध मागे घेण्याबाबत घाईने निर्णय घेतला जाणार नाही. हे निर्बंध तसेच राहतील, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात अणुचाचणीसाठी वापरल्या जाणार्‍या जागेवर स्फोट घडवून आणला होता. भविष्यात हा देश अणुचाचणी करणार नाही, याची ग्वाही या स्फोटाद्वारे देण्यात आली होती. त्याचा उल्लेख करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यासाठी उत्तर कोरियाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, अण्वस्त्रे सोडून देण्यासाठी उत्तर कोरियाने दाखविलेली तयारी म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाला मिळालेले फार मोठे यश ठरते. याआधी उत्तर कोरियाच्या हुकूमशहांबरोबर अणुयुद्धाबाबतच्या धमक्यांचे आदानप्रदान करणार्‍या ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील माध्यमांनी, विश्‍लेषकांनी व काही राजकीय नेत्यांनी सडकून टीका केली होती. पण ट्रम्प यांचे हे आक्रमक धोरण यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रशासनावरील पकड अधिकच भक्कम झाल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे उत्तर कोरियासारख्या चीनच्या प्रभावाखाली असलेल्या देशाला अमेरिकेचे म्हणणे मान्य करण्यास भाग पाडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनला फार मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info