लंडन – जागतिक पातळीवर दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक मंदीची पुनरावृत्ती होण्याचा धोका वाढला असून जग निद्रिस्तावस्थेत नव्या आर्थिक संकटाच्या दिशेने पावले टाकत असल्याचा इशारा ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी दिला. २००८ साली आलेल्या आर्थिक मंदीच्या कालावधीत गॉर्डन ब्राऊन ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
सप्टेंबर २००८मध्ये अमेरिकेच्या अवाढव्य बँकिंग क्षेत्रातील आघाडीची अर्थसंस्था असणारी ‘लेहमन ब्रदर्स’ कोसळली होती. ही घटना जागतिक मंदीची सुरुवात म्हणून ओळखण्यात येते. या घटनेला १० वर्षे पूर्ण होत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा नव्या आर्थिक मंदीचे संकेत मिळण्यास सुरुवात झाली असून व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर याचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसत आहे.
माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी ब्रिटीश दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत, सध्या सुरू असणार्या व्यापारयुद्धामुळे, पुढे येणार्या आर्थिक संकटाचा मुकाबला करणे अधिकच कठीण होणार असल्याचे बजावले. ‘जग झोपेत चालल्याप्रमाणे नव्या आर्थिक मंदीकडे चालत जाण्याचा धोका अधिकच वाढला आहे. धोके वाढत आहेत आणि त्यामुळे बसणारे धक्के जबरदस्त तीव्र असणार आहेत. पण सध्या जग नेतृत्त्वहीन बनले असून त्याचा मुकाबला करणे अधिकच कठीण आहे’, अशा शब्दात ब्राऊन यांनी संभाव्य आर्थिक संकटाचा इशारा दिला.
‘२००८ साली आलेल्या आर्थिक मंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रमाणात परस्परांमध्ये सहकार्य दिसून आले होते तसे २०१८ साली व त्यानंतरच्या काळात शक्य दिसत नाही. विविध देशांच्या मध्यवर्ती बँका व सरकार एकत्रितरित्या काम करण्याची शक्यता दिसत नाही. संकट सोडविण्यापेक्षा त्याचा दोष दुसर्यांवर ढकलण्याचा सरावच जास्त प्रमाणात केला जाईल’, असे ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी बजावले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात सुरू केलेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन नव्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सहकार्य करण्याची शक्यता नाही, असे संकेतही ब्राऊन यांनी दिले. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची आर्थिक धोरणे आंतरराष्ट्रीय सहकार्यातील सर्वात मोठा अडथळा असल्याचा आरोपही ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी केला. त्याचवेळी दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक मंदीनंतर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत अजूनही संभाव्य मंदीचा इशारा देणारी ‘अर्ली वॉनिंग सिस्टिम’ विकसित करण्यात प्रमुख देश अपयशी ठरले आहेत, याची जाणीवही ब्राऊन यांनी यावेळी करून दिली.
इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |