चीनने अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला लक्ष्य केले

चीनने अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला लक्ष्य केले

वॉशिंग्टन/तियांजिन – अमेरिकेने चीनच्या २०० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर दहा टक्के कर लादल्यानंतर, चीनने अमेरिकेच्या 60 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर कर लादून त्याला उत्तर दिले आहे. चीनच्या निर्यातीवर कर लादताना अमेरिकेने सज्जड इशारा दिला होता. चीनने अमेरिकेच्या निर्यातीला यापुढे लक्ष केलेच, तर चीनकडून अमेरिकेला केल्या जाणार्‍या सर्वच्या सर्व ५०० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला लक्ष्य केले जाईल, असे अमेरिकेने बजावले होते. याची पर्वा न करता चीनने अमेरिकी उत्पादनांवर लादलेल्या या करामुळे दोन्ही देशांमधल्या व्यापारयुद्धाचा नवा भडका उडण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिकेच्या सुमारे ६० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर चीनने पाच ते १० टक्क्यांचा कर लादला आहे. यामध्ये कॉफी, मध आणि उद्योगक्षेत्रासाठी लागणार्‍या रसायनांचा समावेश आहे. यापुढे चीन अमेरिकेची एकतर्फी करवाढ आणि बचावात्मक आर्थिक धोरण खपवून घेणार नाही, असे चीनने जाहीर केले आहे. त्याचवेळी मुक्त व्यापार आणि बहुपक्षिय व्यापार सुरळीत व्हावा, यासाठी चीनने अमेरिकेबरोबर चर्चेचाही प्रस्ताव दिला आहे. मात्र सध्या अमेरिका चीनचे प्रस्ताव मानण्यास तयार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

चीन अमेरिकेकडून दरवर्षी ५०० अब्ज डॉलर्सची निर्यात करीत आहे. या रक्कमेचा वापर करून चीनकडून आपल्या देशाची उभारणी सुरू आहे, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पुढच्या काळात चीनचा हा मतलबीपणा अमेरिका सहन करणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी परखडपणे बजावले आहे. जोवर चीन अमेरिकेला समान व्यापारी संधी उपलब्ध करून देत नाही, तोवर चीनच्या निर्यातीला अशारितीने लक्ष्य केले जाईल, असेही ट्रम्प यांनी खडसावले आहे. याबरोबरच चीन अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी व्यापाराचा वापर करीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे.

दरम्यान, अमेरिका आणि चीनमध्ये पेटलेल्या व्यापारयुद्धाचे जागतिक पातळीवर विपरित परिणाम दिसतील व महत्त्वाच्या देशांच्या अर्थव्यवस्था याने बाधित होतील, अशी भीती विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. यामुळे जागतिक मंदी येण्याची शक्यताही काही अर्थतज्ज्ञांनी वर्तविली आहे. पण आजवर अमेरिकेची लूट करणार्‍या चीनच्या कारवाया सहन केल्या जाणार नाहीत, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या व्यापारयुद्धाला चीनचे स्वार्थांध धोरण जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे.

दरम्यान, सध्याच्या काळात चीनला आपली अर्थव्यवस्था स्थिर करणे अवघड बनल्याची कबुली चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी दिली. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत केकियांग यांनी ही कबुली दिली असली तरी चीनचे सरकार जाणिवपूर्वक आपल्या ‘युआन’ चलनाचे अवमुल्यन करीत नाही, असा खुलासाही दिला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info