Breaking News

ब्रिटनचा रशियन राजधानीला अंधारात बुडविणार्‍या ‘सायबरयुद्धा’चा सराव

लंडन – रशियाची वाढती आक्रमकता व संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनने सायबरयुद्धाची जय्यत तयारी सुरू केली आहे. रशियाने ब्रिटन किंवा युरोपिय देशांवर हल्ला चढविल्यास राजधानी मॉस्कोवर सायबरहल्ला चढवून ती पूर्णपणे अंधारात बुडविण्याची योजना ब्रिटनने आखली आहे. त्यासाठी रशियाविरोधात मोठ्या सायबरयुद्धाची रंगीत तालीम नुकतीच घेण्यात आली. रशियाच्या आक्रमणाविरोधात अण्वस्त्रहल्ल्याला पर्याय म्हणून ‘सायबरयुद्धा’ची तयारी करण्यात येत असल्याचे संकेतही ब्रिटीश सूत्रांनी दिले आहेत.

गेल्याच आठवड्यात ब्रिटनसह नेदरलॅण्ड व ऑस्ट्रेलियाने रशियाच्या ‘जीआरयु’कडून चढविण्यात आलेले सायबरहल्ले संपूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे बजावले होते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय व्यवस्था व त्याच्याशी निगडित यंत्रणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्याच्या बचावासाठी चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही ब्रिटनसह इतर देशांनी दिला होता. या इशार्‍यापूर्वी ब्रिटनचा संरक्षण विभाग व गुप्तचर यंत्रणा ‘जीसीएचक्यू’ने रशियाविरोधात ‘ऑफेन्सिव्ह सायबर फोर्स’ची तयारी केल्याची घोषणा केली होती.

काही महिन्यांपूर्वी ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणारे माजी रशियन गुप्तहेर सर्जेई स्क्रिपल यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. यामागे रशिया असल्याचा आरोप करून ब्रिटनने रशियावर आक्रमक निर्बंधांची घोषणा केली होती. त्याचवेळी रशियन कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी विविध पर्याय तयार ठेवण्याचे आदेश ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिले होते. यात सायबरयुद्धाच्या पर्यायाचा समावेश असून ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने रशियाविरोधात सायबरहल्ल्यांची तयारी झाल्याचे संकेत दिले होते.

या पार्श्‍वभूमीवर, ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी रशियाविरोधातील ‘सायबरयुद्धा’च्या रंगीत तालमीबाबत दिलेले वृत्त महत्त्वाचे ठरते. या वृत्तात, ‘सायबरयुद्धा’चा वापर रशियन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत ब्रिटीश अधिकार्‍यांनी दिले.

‘रशियन आक्रमणाला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याची क्षमता ब्रिटनच्या संरक्षणदलांमध्ये नाही. त्याचवेळी रशियाविरोधात युद्ध भडकल्यास त्याची व्याप्ती व वेग याबद्दल ब्रिटीश यंत्रणांना चिंता आहे. रशियन हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे झाल्यास ब्रिटनला थेट अण्वस्त्रांचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. त्याऐवजी सायबरहल्ले हा पर्याय अधिक प्रभावी ठरू शकतो’, असा दावा ब्रिटीश अधिकारी व सूत्रांकडून करण्यात आला.

‘रशियाने ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका अण्वस्त्रहल्ल्यात बुडविली तर ब्रिटनसमोर दुसरा काय पर्याय असणार आहे? त्यांची पाणबुडी बुडवणे किंवा उत्तर रशियात अण्वस्त्र टाकणे, अशा कारवायांव्यतिरिक्त काहीच वेगळे करता येणार नाही. अशा वेळी सायबरक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. ब्रिटन आक्रमक सायबरहल्ले चढवून राजधानी मॉस्को पूर्णपणे अंधारात बुडवून टाकू शकतो. ही गोष्ट रशियन नेतृत्त्वाला थेट इशारा देणारी असेल’, अशा शब्दात ब्रिटीश सूत्रांनी रशियाविरोधात सायबरयुद्धाचाच पर्याय सर्वोत्तम ठरेल, असे संकेत दिले आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info