रिओ दि जानिरो – ब्राझिलवर गेली १५ वर्षे सत्ता गाजवलेल्या डाव्या विचारसरणीच्या आघाडीला हादरे देऊन ‘ट्रॉपिकल ट्रम्प’ म्हणून ओळखण्यात येणार्या ‘झैर बोल्सोनारो’ यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. कट्टर उजव्या विचारसरणीचे बोल्सोनारो माजी लष्करी अधिकारी असून त्यांनी डाव्या आघाडीच्या ‘फर्नांडो हद्दाद’ यांच्यापेक्षा १० लाखांहून अधिक मते मिळविली आहेत. प्रचारादरम्यान जीवघेण्या हल्ल्याचा सामना करावा लागलेल्या बोल्सोनारो यांचा विजय लॅटिन अमेरिकाही उजव्या विचारसरणीच्या दिशेने झुकू लागल्याचे संकेत देणारा मानला जातो.
रविवारी २८ ऑक्टोबरला ब्राझिलमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दुसर्या व अंतिम फेरीसाठी मतदान झाले. यावेळी तब्बल साडेदहा कोटींहून अधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशभरात ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने लॅटिन अमेरिकेसह जगातील अनेक प्रमुख देशांचे त्याकडे लक्ष वेधले गेले होते. निकालपूर्व सर्वेक्षणांमध्ये बोल्सोनारो यांना आघाडी मिळेल, असे संकेत देण्यात आले होते.
मात्र निकाल जाहीर होत असताना प्रतिस्पर्धी हद्दाद यांना ईशान्य ब्राझिलमधील प्रांत वगळता इतर कोणत्याच भागात आघाडी मिळत नसल्याचे चित्र समोर आले. ईशान्य भाग वगळता देशाच्या इतर सर्व भागांमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या बोल्सोनारो यांना मिळणारा प्रतिसाद धक्का देणारा ठरला आहे. एकूण मतदानापैकी ५५ टक्क्यांहून अधिक मते मिळवून बोल्सोनारो यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली.
ब्राझिलच्या लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या ‘झैर बोल्सोनारो’ यांना देशभरातून मिळालेला प्रतिसाद लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. देशातील प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आवाज उठवून भ्रष्टाचार, गुन्हेगारी व अतिरिक्त सरकारी हस्तक्षेप यांना विरोध यावर बोल्सोनारो यांनी प्रचारादरम्यान भर दिला. प्रस्थापितांविरोधातील भूमिका आणि विविध मुद्यांवर कट्टर आक्रमक धोरणासह केलेली वक्तव्ये यामुळे त्यांना ‘ट्रॉपिकल ट्रम्प’ अशी उपाधी देण्यात आली होती.
बोल्सोनारो यांनी ब्राझिलमध्ये १९६० ते १९८०च्या दशकांदरम्यान असणार्या लष्करी राजवटीचे समर्थन केले होते. त्याचवेळी गुन्हेगारी संपविण्यासाठी देशातील अधिकाधिक नागरिकांच्या हाती बंदुका द्यायला हव्यात, असेही वक्तव्य केले होते. खाजगीकरणाचे समर्थन असलेल्या बोल्सोनारो यांनी येत्या काळात सरकार उपक्रमांचे खासगीकरण करण्याची घोषणाही केली आहे. गेली दीड दशके डाव्या विचारसरणीला भरभरून समर्थन देणार्या ब्राझिलने परंपरागत व्यवस्थेला विरोध म्हणून बोल्सोनारो यांना भरभरून प्रतिसाद दिल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो.
विजयानंतर बोल्सोनारो यांनी परमेश्वराचे आभार मानले असून आपण परमेश्वराच्या साक्षीने ब्राझिलचा कायापालट करण्याची शपथ वाहणार असल्याचे म्हटले आहे. बोल्सोनारो १ जानेवारी रोजी बोल्सोनारो राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. अमेरिकेसह लॅटिन अमेरिकेतील सर्व देशांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |