व्हेनेझुएलाचे १४ टन सोने परत देण्यास ‘बँक ऑफ इंग्लंड’चा नकार

व्हेनेझुएलाचे १४ टन सोने परत देण्यास ‘बँक ऑफ इंग्लंड’चा नकार

लंडन/कॅराकस – सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ साली व्हेनेझुएलाचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांनी परदेशातील तब्बल १६० टन सोन्याचे साठे मायदेशी आणून इतिहास घडविला होता. व्हेनेझुएलाच्या या कामगिरीनंतर जर्मनी व नेदरलॅण्डसारख्या अनेक युरोपिय देशांनी आपले परदेशातील सोने मायदेशी आणण्यात यश मिळविले होते. मात्र चावेझ यांच्या मृत्यूनंतर व्हेनेझुएलाची सूत्रे सांभाळणारे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना चावेझ यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले आहे. ब्रिटनच्या ‘बँक ऑफ इंग्लंड’ने व्हेनेझुएलाचे १४ टन सोने परत देण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘बँक ऑफ इंग्लंड’, नकार , निकोलस मदुरो, सोने, world war 3, व्हेनेझुएला, अमेरिकाव्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था कोसळली असून महागाई व चलनवाढीचा दर तब्बल आठ लाख टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष मदुरो यांच्या दडपशाही व एकतंत्री राजवटीला कंटाळून लाखो नागरिक व्हेनेझुएला सोडून परागंदा झाले असून परकीय गुंतवणुकीसह महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आक्रमक उपायांची घोषणा केली होती.

त्यात व्हेनेझुएलाचे चलन ‘बोलिव्हर’चे ९५ टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले होते. त्याचवेळी देशातील इंधनसाठ्यांच्या पाठबळावर ‘पेट्रो’ ही क्रिप्टोकरन्सी सुरू करून त्याला चलनाचा दर्जा दिला होता. मात्र या उपायांनंतरही व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सावरण्याऐवजी अधिकाधिक घसरत चालल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या वर्षअखेरपर्यंत व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था तब्बल १८ टक्क्यांनी घसरेल, असा गंभीर इशाराही दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी परदेशातील सोन्याचे साठे माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ब्रिटनची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘बँक ऑफ इंग्लंड’कडे असलेल्या सोन्यातील १४ टन सोने माघारी आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत असून व्हेनेझुएला सरकारमधील सूत्रांनी त्याला दुजोरा दिला आहे. मात्र मदुरो राजवटीच्या या प्रयत्नांना ‘बँक ऑफ इंग्लंड’ने धक्का दिला असून सोने परत देण्यास नकार दिला आहे.

‘बँक ऑफ इंग्लंड’, नकार , निकोलस मदुरो, सोने, world war 3, व्हेनेझुएला, अमेरिका‘बँक ऑफ इंग्लंड’च्या नकारामागे सुरक्षा व सोन्याचे भवितव्य अशी दोन कारणे देण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बँक ऑफ इंग्लंड’ने व्हेनेझुएलात परत पाठविण्यात येणार्‍या सोन्याच्या वापराबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांच्या हेतूंवर संशय व्यक्त करून ते सोन्याच्या साठ्यांचा वापर वैयक्तिक फायद्याकरता करतील, असा दावा ‘बँक ऑफ इंग्लंड’कडून करण्यात आला आहे. त्याचवेळी १४ टन सोन्याचा साठा माघारी आणण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था व्हेनेझुएला पुरवू शकत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

गेल्या चार वर्षात व्हेनेझुएलाच्या सत्ताधारी राजवटीकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री करण्यात येत आहे. २०१४ साली व्हेनेझुएलाकडे सुमारे ३६० टन इतके सोने होते. गेल्या चार वर्षात त्यातील तब्बल २०० टन सोन्याची विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे व्हेनेझुएलातील सोन्याचे साठे १६० टनांपर्यंत घसरले आहेत. या वर्षात पहिल्या १० महिन्यातच व्हेनेझुएलाने तब्बल २४ टन सोन्याची विक्री केली आहे. सुमारे ९० कोटी डॉलर्सचे हे सोन्याचे साठे एकट्या तुर्कीला विकण्यात आल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही वर्षात विविध देशांनी अमेरिका तसेच ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेत ठेवलेले सोन्याचे साठे माघारी मिळविण्यात यश मिळविले असून काही देशांकडून अजूनही प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर, व्हेनेझुएलाचे सुमारे ५५ कोटी डॉलर्स मूल्याचे १४ टन सोने परत देण्यास नकार देण्याचा ‘बँक ऑफ इंग्लंड’चा निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info